चंद्रपूर - आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणने आज पासून वीजबिल वसुली मोहीम राबवायला सुरुवात केली आहे, कोरोना काळात ही बिलवसुली थांबविण्यात आली होती.
महाराष्ट्र अनलॉकच्या टप्प्यात आल्यामुळे थकित वीजबिलांची वसुली करण्याचे महावितरणाने ठरवले आहे. आजपासून ही थकित वीज बिलांची वसुली केली जाणार आहे.
वर्ष 2020 मधील 4099 कोटी, एप्रिल 2021 मध्ये 849 कोटी, तर मे 2021 मध्ये 1386 कोटी वीज बिल वसुल करायची आहे. 11 जूनपासून वीज बिल वसुली करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे.
वीजनिर्मिती आणि कर्जाच्या बोज्यामुळे महावितरण संकटात आली असून ही बिल वसुली पुन्हा सुरु केली जाणार आहे.
महाराष्ट्रात कोरोना संकट काळामध्ये वाढीव वीज बिलं महावितरण कंपन्यांनी दिल्याने अनेकांनी संताप व्यक्त करत वीज दर कमी करण्याचे, वाढीव बीलांचा पुन्हा विचार व्हावा अशी मागणी केली होती मात्र महावितरण कंपन्यांनी वीज बिल न भरल्यास कनेक्शन कापण्याची धडक कारवाई सुरू केली होती.
आता इन्स्टॉलमेंट ने हफ्ते न पाडता वीजबिल पूर्ण भरण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
महाराष्ट्रात एकदाही वीज बिल न भरलेल्यांची संख्या ४१ लाख ७ हजार घरगुती ग्राहकांसह विविध वर्गवारीतील ८० लाख ३२ हजार ग्राहक इतकी आहे. आता वीज कंपन्यांकडून सार्यांनाच पूर्ण वीजबिल एकावेळीच भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
