प्रतिनिधी/अनिकेत अगडे
तळोधी बा.-- अप्पर तहसील कार्यालय तळोधी बा पासून पाच किमी अंतरावर असलेल्या जनकापुर गावात गेल्या एक महिन्यापासून वीज पुरवठा सुरळीत नसल्याने जनकापुर वासीय त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वीज बिल भंरणार नसल्याचा निर्धार गाव वासीयांनी केला आहे.
जनकापुर या गावाची वीज गेल्या एक महिन्यापासून दिवसातून फक्त दोन ते तीन तास राहते,सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रात्री जर वीज गेली तर वीज लवकर येत नाही. या विषयी गावकऱ्यांनी अनेकदा वीज वितरण कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांना सूचना केल्या, मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. गेल्या महिन्याभरात वीज पुरवठा अनियमित आहे मात्र वीज बिल त्या तुलनेत जादा आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
येत्या काही दिवसात जर वीज पुरवठा नियमित केला नाही तर वीज बिल भरणार नाही असा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. व इतकेही करून जर वीज पुरवठा नियमित झाला नाही तर वीज वितरण कार्यलायावर मोर्चा काढण्यात येईल असेही गावकऱ्यांनी ठरवले आहे.
जनकापुर वासीयांच्या समस्येवर लोकप्रतिनिधीनी लक्ष द्यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
