कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील ९० टक्के आदिवासी असलेल्या धामणगाव व नैतामगुडा या गावातील रेशन लाभार्थ्यांकडून धामणगाव येथील संतोषी माता महिला बचत गट हे तीनपट रक्कम घेऊन नियतनापेक्षा कमी धान्य देत होते.त्यामुळे एप्रिल २०२० मध्ये जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडे तक्रार केल्यानंतर दुकान निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर धामणगाव व नैतामगुडा या दोन्ही गावातील १५० पैकी १०१ लाभार्थ्यांनी स्वतंत्ररीत्या जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडे अर्ज करून सदर दुकान कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी केली होती.दोनदा याबाबत अर्ज दिल्यानंतरही पुरवठा विभागातर्फे अजूनपर्यंत रास्तभाव दुकानाची स्वतंत्ररीत्या चौकशी करण्यात आली नाही. १७ जून २०२१ रोजी संबंधित शिधापत्रिका धारकांना पूर्वसूचना न देता तहसील कार्यालयाकडून पुरवठा निरिक्षकाने अचानकपणे गावात येऊन बयाने घेतले असून ही बयाने तक्रारकर्त्यांना संशयास्पद वाटत आहे.
ज्याच्यांविरुद्ध नागरिकांची तक्रार होती त्या दुकानदारांच्या व बचत गटातील सदस्यांच्या उपस्थितीत बयाने घेण्यात आल्याने बयान घेणाऱ्या अधिकाऱ्याविषयी लाभार्थ्यांमध्ये संशयास्पद स्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे लाभार्थ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुरवठा विभागाकडून चौकशीची अपेक्षा लाभार्थ्यांना आहे.सदर दुकानातून लाभार्थ्यांना योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत कधीही २ रुपये प्रति किलो प्रमाणे गहू व ३ रुपये प्रति किलो प्रमाणे तांदूळ मिळालेले नाही.तसेच लाभार्थ्यांकडून सरसकट ८०,१००,१५०,२००,२५० अशा पद्धतीने रक्कम घेण्यात येत होती असे बोलले जात आहे.सदर महिला बचत गटाकडून असाचप्रकारे तब्बल १० वर्ष अशिक्षित आदिवासींची मोठ्याप्रमाणात लूट झाली असून लाभार्थ्यांकडून आजपर्यंत घेण्यात आलेली अतिरिक्त रक्कम दुकानदारांकडून वसूल करून देण्याची मागणीही निवेदन देणाऱ्या लाभार्थ्यांनी केली आहे.मागील एक वर्षापासून दुकान निलंबित असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून दुकान कायमस्वरूपी रद्द करावे अशी मागणी १०१ लाभार्थ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे केली आहे.मात्र निवेदनाची योग्य दखल न घेतल्याने लाभार्थ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
येथील शिधापत्रिका धारकांना नियमाप्रमाणे धान्य न देता कमी धान्य देत आगाऊची रक्कम वसूल करीत असल्याचे आरोप होत आहे.येथील 90 टक्के ग्राहक हे आदिवासी असून त्यातील बरेच अशिक्षित आहे.त्यांच्या अशिक्षितेचा फायदा घेऊन सदर दुकानदाराकडून गेल्या कित्येक वर्षांपासून यांची लूट करीत असल्याचेही आरोप होत आहे.याबाबतची तक्रार देण्यात आल्याची माहिती असून कारवाईसाठी जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचे आरोप होत आहे.धामणगाव येथील रास्तभाव दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याऐवजी थातूरमातूर कारवाई करून परवाना निलंबित केल्याने दुकान कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी १०१ शिधापत्रिका धारकांनी दिलेली तक्रार थंड बस्त्यात टाकली की काय अशी शंका व्यक्त होत आहे.आता जुन्याच दुकानदाराला रास्तभाव दुकान जोडण्याच्या हालचाली सुरू झाल्याची बाब धामणगाव व नैतामगुडा येथील शिधापत्रिका धारकांच्या लक्षात आल्याने लाभार्थी आता तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याची योजना आखत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.