घुग्गुस/कोरपना - जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती सध्या काही प्रमाणात नियंत्रणात येत आली तरी आजही अवैध धंदे मात्र अनियंत्रितचं आहे.
कोरपना तालुक्यातील तामसी घाटचा लिलाव झाला असला तरी या घाटावर नियमबाह्य वाळूचा उपसा सुरू आहे.
हा घाट विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वढा येथील त्रिवेणी नदीच्या काठावर आहे, त्यातील काही भाग गडचांदुर तर काही भाग हा घुग्गुस पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो.
कोरपना तालुक्यातील भरोसा गावातून हा तस्करीचा मार्ग सुरू होतो, नियमबाह्य पध्दतीने या घाटावर जेसीबी मशीन, हायवा ट्रक द्वारे वाळूची लोडिंग सुरू असून ते पूर्णपणे नियमबाह्य आहे.
विशेष म्हणजे या घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा आहे मात्र ते कधी काळी सुरू असतात.
तामसी घाटावर विविध ठिकाणी म्हणजेच वाळू घाटाच्या सीमेच्या बाहेर सुद्धा वाळूचा उपसा सुरू आहे. वाळू माफिया दिवस रात्र एक करीत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करीत आहे.
सदर घाटावर मोठमोठे खड्डे वाळू माफियांद्वारा अवैध रित्या वाळूचा उपसा केल्याने झाले आहे.
महसूल प्रशासनाने यावर काही कारवाई करून शासनाचा महसूल वाचवण्यासाठी काही प्रयत्न करावा अशी मागणी गावकरी करीत आहे.
कारण काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी या वाळू उपस्याला विरोध केला मात्र माफियांनी धाक दाखवीत गावकऱ्यांचा आवाज दाबला.