चंद्रपूर - रविवारी सोसाट्याच्या वार्यासह चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसला. बळीराजा मान्सूनच्या प्रतीक्षेत होता. अखेर मृगधारा बरसताच शेतकरी वर्गाला या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय या वादळी पावसामुळे शहरातील अनेक भागात विजपुरवठा बराच वेळ खंडीत झाला होता. तर बोकारे प्लॉट, पठानपुरा गेट निकालस मंदिराजवळ मोठी झाडे उन्मळून पडली होती. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली.
जून महिन्याला प्रारंभ होताच शेतकरी वर्गाचे लोचन आभाळाकडे लागले होते. मागील महिनाभरापासून बळीराजा मान्सूनपूर्व मशागतीच्या कामाला लागला होता. त्यातच यंदा मान्सून लवकर आगमन करणार असल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तविले होते. त्यामुळे मागील चार पाच दिवसांपासून सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती. अखेर मृगधारा बरसताच शेतकरी वर्ग खरीपाच्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, पोंभुर्णा, राजुरा, गडचांदूर आदी तालुक्यांमध्ये सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ढगांचा गडकडाट व विजेच्या कडकडाटासह जोरदार मुसळधार पाऊस झाला. जोरदार बरसलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी विज पुरवठा खंडीत झाला होता. चंद्रपुर शहरात देखील विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, पावसाला सुरूवात झाल्याने मागील दहा दिवसांपासून उकाड्याने हैरान झालेल्या चंद्रपुरकरांना वातावरणातील गारव्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली.
आज झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे बोकारे प्लॉट, पठाणपुरा मार्गावरील निकालस महाराज मंदिराजवळ मोठी वृक्ष उन्मळून पडली. यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. यानंतर पावसाचा जोर कमी होताच मनपाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी दाखल होत रस्त्यावर पडलेली महाकाय वृक्ष बाजुला करून वाहतूक सुरळीत सुरू केली. अनेक ठिकाणी विजेचे खांब देखील पडल्याचे वृत्त आहे.
