चंद्रपूर - शहरातील तुकुम वार्ड नं 2 लॉ कॉलेज परिसरातील पाणी टाकीजवळ एका मोकळ्या जागेवर असलेल्या शेकडो पाईपांच्या मधोमध एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने या भागात एकच खळबळ उडाली. ही घटना आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
सकाळी या परिसरात फिरायला जाणा-यांची संख्या मोठी असते. अशाच एका व्यक्तीला पाईपच्या आत कुठल्यातरी व्यक्तीचा मृतदेह दिसून आला. सदर व्यक्तीने या घटनेची माहिती रामनगर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. मृतक व्यक्ती हा घटनास्थळाहून जवळच असलेल्या चवरे ले आउट येथील 62 वर्षीय वृद्ध असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यक्तीला नशेचं व्यसन होते आणि ते चिडचिड्या स्वभावाचे व्यक्ती असल्याची माहिती कळते. सदर वृद्धाची हत्या आहे की, आत्महत्या हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
