यवतमाळ - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सुरू आहे, या अवैध वाळू उपस्याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशासन व वाळू माफियांच्या साठेलोटाबद्दल पुरेपूर माहिती काढत असतात पण काही कार्यकर्ते माहिती अधिकाराचा दुरुपयोग करून अवैध धंदे चालकांकडून खंडणी गोळा करण्याचे काम करीत असतात.
यवतमाळ जिल्ह्यातील अश्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये दहशत पसरावी यासाठी वाळू माफियांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे अपहरण करीत विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर त्याचा व्हिडीओ तयार करीत समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आला.
गुरुवारी या प्रकरणाची शहर पोलिसात तक्रार झाल्याने 9 आरोपींवर गुन्हा दाखल करीत 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी चंदन सुदाम हातागडे रा.नेताजीनगर, यवतमाळ याने गुरुवारी रात्री यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत सांगितले आहे की, "बुधवारी तो आपला भाऊ विकाससोबत दुचाकीने भोसा येथे मित्राला भेटायला गेला असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील युवक समीर राजा याने मोबाइलवरून फोन केला व आपल्याला बोलण्यासाठी दिला. तेव्हा शगीर मिस्त्रीने अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळातच तिथे चारचाकी वाहन आले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून दोन्ही भावांना वाहनात बसविले, मोबाइल हिसकावून घेतले. त्यानंतर पांढरकवडा मार्गावरील उड्डाण पुलानजीकच्या एस. एम. कन्स्ट्रक्शन येथे नेले. तेथे जबर मारहाण करण्यात आली. खिशातील २८ हजार रूपये काढून घेण्यात आले. विवस्त्र करून नग्न अवस्थेतील व्हिडिओ बनविला व प्रसारित केला. या मारहाणीत आपण दोन वेळा बेशुद्ध झालो. त्यानंतर आपल्याला शुद्धीवर आणण्यात आले. जातीवाचक शिवीगाळ केली गेली. त्यानंतर मारहाण करणारे सर्वजण तेथून पसार झाले".
पोलिसांनी याप्रकरणी मोहम्मद शगीर मोहम्मद अन्सारी (४५), रा.पॉवरहाऊस, पांढरकवडा रोड, समीर राजा (२६), शगीरचा भाऊ सलीम अन्सारी (३९). सचिन महल्ले (४३), अतुल शामराव कुमटकर (३८), रा. तलावफैल, छोटू भांदक्कर (४०), रा. टिळकवाडी, शाज अहेमद नजीर अहेमद (३६), अजय श्रीराम गोलाईत (३९), कादर याचा भाऊ मन्सूर अशा नऊ जणांविरूद्ध भादंविच्या ३६५, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३२४, ५०४, ५०६ तसेच अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यातील मोहम्मद शगीर मोहम्मद अन्सारी, शाज अहेमद नजीर अहेमद आणि अजय गोलाईत या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांनी दिली.
जिल्ह्यात रेती तस्कारांमध्ये प्रचंड स्पर्धा असून यातून गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या आहेत. त्यांनी आपापले परिसर वाटून घेतले आहे. शिवाय उपसा करून आणलेली रेती शहरात अनेकांना दमदाटी करून मोकळ्या जागेत साठविण्यात येत असल्याने नागरिकही त्रस्त झाले आहेत. या रेती तस्कारांना सत्ताधारी पदाधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांचेही पाठबळ असल्याने, आता पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ हे नेमकी काय कारवाई करतात? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. हा कथित माहिती अधिकार कार्यकर्ता माहितीच्या आधारे रेती माफियांना ब्लॅकमेलिंग करीत असल्याने त्यातून हा प्रकार घडल्याची चर्चा सुरू आहे.
