चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. दारुबंदीनंतर उठविल्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दीक युद्ध सुरू आहे. दारूबंदी उठवण्याला अनेक सामाजिक संघटनांचा विरोध देखील होता. मात्र, दारुबंदीनंतर अवैध दारू विक्री आणि त्याअनुषंगाने गुन्हेगारी घटना वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान दारुबंदी उठविल्यानंतर आता राजकीय जुगलबंदी पहायला मिळत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा जुना व्हिडीओ ट्विट करत जाब विचारला आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, "क्या हुआ तेरा वादा..जयंतराव जी सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळला दारूबंदी करणार, इस आश्वासन का.
राज्यातील राष्ट्रवादी कांग्रेसच्या संघर्ष यात्रेदरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील स्वामीनी संघटनेने जयंत पाटील यांची भेट घेत यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करावी या मागणीचे निवेदन दिले होते.
त्यावेळी स्वामिनी संघटनेचे निवेदन विधिमंडळ अधिवेशन दरम्यान जयंत पाटील यांनी तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे समोर वाचवून दाखविले होते.
लचंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी आपण करू शकता तर यवतमाळ जिल्ह्याची का नाही? असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता, आपल्याला शक्य असेल तर करा नाहीतर आमची सरकार ज्यावेळी राज्यात येणार तेव्हा पहिल्या कॅबिनेट बैठकीत आम्ही यवतमाळ जिल्ह्याची दारूबंदी घोषित करू.
आता महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले ती कॅबिनेट मिटिंग अजून झाली नाही का? यवतमाळ जिल्ह्याच्या दारूबंदी बाबत असा खोचक ट्विट भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केलं आहे.

