नागपूर - कोरोना झालेल्या रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन देऊन बरे करण्यात येत असल्यामुळे सध्या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. आयसीयूत असलेल्या कोरोना पेशंटसाठी नातेवाइकांनी आणलेले रेमडेसिव्हिर स्वतःच्या बॅगमध्ये ठेवायचे आणि रुग्णाला चक्क अॅसिडीटीचे इंजेक्शन टोचायचे, असा प्रकार सुरू झाला आहे. असा प्रकार करताना डॉक्टर तरूणीसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. देवयानी पडोले, असे युवा डॉक्टरचे नाव आहे.
मागच्या २० एप्रिलला पोलिस उपायुक्त परिमंडळ-४ च्या पथकाने कारवाई करून न्यूरॉन रुग्णालयाचा परिचारक शुभम संजय पानतावणे (वय २४, रा. सेवाग्राम), मनमोहन नरेश मदने (वय २१) आणि प्रणय दिनकरराव येरपुडे (वय २१) दोन्ही रा. महाल यांना मेडिट्रीना रुग्णालयासमोर दोन रेमडेसिव्हिरसह रंगेहात पकडले होते. या प्रकरणी सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास केला असता शुभम हा दिनेश गायकवाड नावाच्या मित्रासह एकाच खोलीत राहायचा. दिनेश हा डोंगरगाव परिसरातील कोविड रुग्णालयात परिचारक असून त्याने रुग्णालयातील आयसीयूत दाखल एका रुग्णाला लावण्यासाठी देण्यात आलेले रेमडेसिव्हिर चोरले होते. त्याऐवजी त्याने रुग्णाला अॅसिडीटीचे इंजेक्शन लावले होते. रुग्णाच्या कार्डवर रेमडेसिव्हिर दिल्याची नोंद केली. रुग्णाच्या जिवाशी खेळून त्याने ते इंजेक्शन काळाबाजार करण्यासाठी स्वत:च्या खोलीत ठेवले होते. दरम्यान खोलीत दोन रेमडेसिविर असल्याचे माहीत पडताच शुभमने ते चोरले व त्याने सेवाग्राम येथील रुग्णालयात डॉक्टर असलेल्या देवयानी पडोले हिला अधिकच्या भावात विकण्याचे ठरवले. तिने शुभमशी रेमडेसिविरसाठी संपर्क केला होता. या प्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी देवयानी पडोले व दिनेश यांनाही अटक केली असून त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
प्रकरणाचा तपास करताना एका आरोपीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तपासातील कर्मचाऱ्यांनी स्वत:ची चाचणी करून घेतली असून दोन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. आता त्या पोलिसाला रेमडेसिव्हिर देण्याची वेळ आल्याची माहिती समोर आली आहे.