चंद्रपूर - 18 मे ला चंद्रपूर मनपाच्या "आसरा" या कोविड रुग्णालयाचे उदघाटन करण्यात आले.
उदघाटन कार्यक्रम संपल्यावर मनपा आयुक्त राजेश मोहिते, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, नगरसेवक डॉ. सुरेश महाकुलकर, संदीप आवारी, सुरेश पचारे, संजय कंचर्लावार, अनिल फुलझेले व आरोग्य अधिकारी अविष्कार खंडाळे सहित अनेकांनी कोरोना नियम धाब्यावर बसवून मास्कविना फोटो काढून आपला बेजबाबदारपणा दर्शविला.
तो फोटो अनेक समाजमाध्यमांवर (News34) चांगलाच व्हायरल झाला, त्यामुळे पालिकेला आपली चूक कळली व आयुक्त व महापौर यांच्यासमवेत सर्वांनी दंड भरून आपली जबाबदारी पार पाडली.
मात्र साथरोग कायदा व जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याने सजग नागरिक म्हणून
आम आदमी पार्टीचे मयूर राईकवार यांनी साथरोग कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पालिका पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार (Online) नोंदविली.
आम आदमी पार्टीचे मयूर राईकवार यांनी आपल्या तक्रारीत जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना पालिकेतील अधिकारी व पदाधिकारी यांनी 40 लोकांना जमा करून मास्कविना फोटो काढले.नियम हे सर्व सामान्य नागरिकांसाठीच आहे का? महापौर व आयुक्त सह सर्वांवर साथरोग कायदा 1897 व जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करावे व सर्वांची RTPCR चाचणी करण्यात यावी जेणेकरून कोरोना पसरायला नको.
राईकवार यांच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासन काय कारवाई करेल याकडे शहर वासीयांचे लक्ष लागले आहे.
