चंद्रपूर - जिल्ह्यात कोरोनाची लाट वेगाने पसरल्यावर सुद्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कार्यरत डॉक्टरांनी स्वतःचे कोविड सेंटर उभारून जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवा देण्याचे टाळले.
काहींनी तर कुठलीही नोंदणी न करता अवैध पद्धतीने रुग्णांवर उपचार करणे सुरू केले मात्र जिल्हा प्रशासनाने काही अवैध कोविड सेंटरवर धाड टाकीत कारवाईचे सत्र सुरू केले आहे.
जिल्हा परिषद समोर असलेल्या डॉ. वैभव भोयर यांच्या खासगी रूग्णालयात विनापरवानगीने कोरोना रूग्णावर उपचार केल्याच्या तक्रारीवरून अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या पथकाने शनिवार, 8 मे रोजी छापा मारला. तपासणीत बाधितावर उपचार केल्याची बाब निदर्शनास आली. पण, सद्या त्या रूग्णालयात कुठलाही रूग्ण दाखल नाही. त्यामुळे डॉ. भोयर यांना महानगरपलिका प्रशासन नोटीस बजावणार असून, खुलासा मागवेल. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.
मागील पाच ते सहा दिवसांपूर्वी एका बाधित रूग्णावर डॉ. भोयर यांनी उपचार केल्याची माहिती विद्युत वरखेडकर यांच्या पथकाला मिळाली होती. तो रूग्ण बरा होऊन सद्या आपल्या घरी आहे. माहितीच्या आधारे अतिरिक्त जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे यांच्या पथकाने छापा मारला. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक व रामनगर पोलिसांचे पथक होते. रूग्णालयाची संपूर्ण तपासणी केली असता, रूग्णालयात एकही बाधित रूग्ण दाखल नव्हता. अनावधनाने त्या रूग्णावर उपचार केल्याची बाब डॉ. भोयर यांनी मान्य केल्याचेही कर्डिले यांनी सांगितले. याशिवाय अन्य संशयास्पद इंजेक्शन व औषधसाठा मिळून आला नाही. पण, यापुढे असे प्रकार घडू नयेत, यासाठी त्यांना खुलासा नोटीस बजावला जाईल. त्यांच्या उत्तरानंतर योग्य ती कार्यवाही करू, असेही ते म्हणाले.