वणी/ माथेली - कोरोनाच्या भीषण महामारीत नागरिकांनी बाहेर न निघावे यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली मात्र नागरिक संचारबंदीतही सर्रासपणे बाहेर निघत आहे, आज अनेकांना कोरोनाची बाधा झाली, अनेकांनी जीव सुद्धा गमावला मात्र काही बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा विळखा वाढत आहे.
सरकारने काही वेळेसाठी दारूची दुकाने सुरू ठेवली आहे, मात्र दारूबंदी जिल्ह्यात अवैध दारू सुरू असल्याने छुप्या मार्गाने चंद्रपुरात दारू येत असून मद्यप्रेमींची तहान त्याने भागत होती पण चंद्रपूर पोलीस प्रशासनाच्या कारवाईने अवैध दारू तस्कर धास्तावले असता जिल्ह्यात दारूचा दुष्काळ पडल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यप्रेमी यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात जात असतात.
वणी तालुक्यातील माथोली, जुगाद व कैलास नगर येथे 2 बिअर बार व 1 देशी दारू भट्टी असून त्याठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातील मद्य प्रेमींची अफाट गर्दी असते.
इतकंच नव्हे तर मद्यप्रेमी दारू घेतल्यावर परिसरात कुठेही बसून दारूचं सेवन करतात यामध्ये मद्य प्रेमींचे आपसात भांडण होत असतात व परिसरातील महिलांना अश्लील शब्दात इशारे करण्याचे काम करतात.
गावातील मार्गातून जाण्यासाठी महिलांना मद्यप्रेमींच्या छेडखाणीला सामोरे जावे लागत आहे, या प्रकाराची पोलिसात तक्रार करायची असल्यास माथोली गावातून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरपूर गावात जावे लागते.
तिथे जाण्यासाठी सुद्धा 30 मिनिटांचा कालावधी लागत असतो, हा प्रकार थांबायला हवा यासाठी माथोली ग्रामपंचायत सदस्य ऍड. प्रतीक्षा देऊळकर यांनी ग्रामपंचायत सचिव यांना निवेदन देत गावात पोलीस चौकीची मागणी केली.
जेणेकरून महिलांना होणार त्रास, गावातील नागरिकांसोबत होणारे भांडण यामुळे आटोक्यात येतील याकरिता तात्काळ माथोली गावात पोलीस चौकी उभारून गावातील नागरिकांना या समस्येतून मुक्त करण्याची विनंती देऊळकर यांनी निवेदनामार्फत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांना मागणी केली आहे.


