चंद्रपूर - मोटेल आणि रेस्टॉरंटच्या बांधकाम परवानगीसाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सहायक नगर रचनाकार यांनी 50 हजारांची लाच फिर्यादीला मागितली मात्र या प्रकरणी फिर्यादीने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागात केल्याने सहायक नगर रचनाकार यांना रंगेहात अटक केली.
फिर्यादी हे भद्रावती येथील रहिवासी असून मौजा टाकळी येथे सर्व्हे क्रमांक 80/2/अ/2 आरजी 1.01 या शेत जमिनीवर मोटेल व रेस्टॉरंट च्या बांधकामासाठी लागणारे नाहरकत प्रमाणपत्र द्यावे यासाठी अर्ज केला मात्र सहायक नगर रचनाकार 50 वर्षीय अनिल श्रावण चहांदे यांनी फिर्यादीला 50 हजारांची लाच मागितली.
फिर्यादीला लाच द्यायची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरला तक्रार दिली.
लाचलुचपत विभागाने तक्रारीची पूर्ण पडताळणी केली, सदर प्रकरणी चहांदे यांनी तडजोडी अंती 10 हजार रुपये घेण्याचे ठरविले.
लाचलुचपत विभागाने सापळा रचत नगररचना कार्यालयात 10 हजार रुपये स्वीकारताना अनिल चहांदे यांना रंगेहाथ अटक केली.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त/पोलीस अधीक्षक लाचलुचपत विभाग नागपूर, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे, मनोहर एकोणकर, संतोष येलपुलवार, अजय बागेसर, संदेश वाघमारे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
