सावली - बोथली मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. एका दुचाकीवर तीन जण पांढरसराड वरुन सावली ला येत होते. तर दुसऱ्या दुचाकीवरील दोघे जण बोथली मार्गाने जात होते. हा अपघात आज सकाळी ८.३० च्या दरम्यान सावली - बोथली मार्गावरील चिंतलवार राईस मिल पुढील वळणावर झाला.
बजाज डिस्कवर कपंनीची एम. एच. ३४ ए. क्यु. ९९१२ या दुचाकीने पांढरसराड वरुन उत्तम मारोती कन्नाके , वय ३५, सुष्मा उत्तम कन्नाके , वय ३० आणि मारोती गोविंदा कन्नाके , वय ६५ हे सावलीला रुग्णालयात येत असतांना सावली वरुन बोथलीला भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी चालक कालीदास आबाजी घोडमारे, वय २३ आणि मागील बसलेला साथीदार बाळकृष्ण भजन चौधरी, वय ३५ यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने विरुध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने पाच जण गंभीरपणे जखमी झालेत.
अपघाताची माहीती होताच १०८ क्रमांकाची एम्बुलन्स घटणा स्थळी दाखल होऊन पाचही अपघातग्रस्तांना ग्रामीण रुग्णालय सावली येथे प्राथमिक उपचार करुन चार गंभीर जखमींना गडचिरोली येथील रुग्णालयात पाठविण्यात आले . परंतू पांढरसराड येथील मारोती गोविंदा कन्नाके यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर उत्तम मारोती कन्नाके यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. सावली पोलीस उपनिरीक्षक चिचघरे यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर बोधे , मेजर मडावी , पो. शि.चव्हाण पुढील तपास करत आहेत.
