ताजी बातमी - राज्यात कोरोनाचं थैमान सुरूच असल्यामुळे राज्य सरकारकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत उद्या दुपारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. कडक निर्बंध लादूनही परिस्थिती बदलत नसल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळतंय. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील उपाययोजनांबाबात उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे सरकार आता राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळतेय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या जी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, त्या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित असणार आहेत.
राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनबाबत चर्चा होणार आहे. सध्याची रुग्णसंख्या ही पाच लाख आहे. पुढच्या काही दिवसात ही संख्या दहा लाखांवर गेली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे लॉकडाऊनबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत विरोधी पक्षाचं मत घेतलं जाईल', असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
