वर्धा - संपूर्ण राज्यात सध्या कोरोनानं हाहाकार माजवला आहे. अनेकांना यामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शन कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी संजीवनी ठरत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. पण आता एक दिलासादायक माहिती समोर येतेय. आता रेमडेसिव्हिरचं उत्पादन विदर्भातच होणार आहे.
नागपूर आणि विदर्भात असलेली रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता लक्षात घेता वर्ध्याच्या 'जेनेटेक लाईफ सायन्सेस'ला ३० हजार वायल प्रतिदिन रेमडेसिव्हिर इंजेक्शन तयार करण्याची परवानगी मिळाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याबद्दल सातत्यानं पाठपुरावा करत होते.
रेमडेसिव्हिर तयार करणाऱ्या गिलेड कंपनीने सात कंपन्यांना हे इंजेक्शन तयार करण्याची परवानगी दिली होती. त्यातील एक कंपनी 'लोन लायलंस'द्वारा जेनेटिक लाईफ सायन्स रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करेल. साधारण एका आठवड्यात वर्ध्यात रेमडेसीवीरचे उत्पादन सुरू होईल आणि पंधरा दिवसांत ३० हजार वायल प्रतिदिन इंजेक्शन्स विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांत उपलब्ध होणार आहेत.
विदर्भातच रेमडेसिव्हिरचं उत्पादन सुरु होत असल्यामुळे आता कोरोना रुग्णांना आणि नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. यामुळे रुग्णांचे जीव वाचण्यातही मदत होणार आहे.