यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात सोमवारी सकाळी गर्भवती वाघिणीची शिकार उघडकीस आली. या वाघिणीच्या समोरील पायाचे पंजे शिकाऱ्यांनी कापून नेले. सुमारे महिनाभरापूर्वी झरी तालुक्यात देखील वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. यवतमाळ जिल्ह्यात एकाच महिन्यात दोन वाघांच्या शिकारी उघडकीस आल्याने स्थानिक शिकाऱ्यांच्या टोळया या तालुक्यात सक्रिय झाल्याची चर्चा आहे.
पांढरकवडा वनविभागाअंर्गत मुकु टबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वनकक्ष क्र . ३० मध्ये सकाळी गस्तीदरम्यान वनरक्षकाला वाघिणीचा मृतदेह आढळून आला. याठिकाणी नाल्याला लागूनच एक गुहा आहे आणि या गुहेचा वापर ही वाघीण करत होती.
गुहेचे प्रवेशद्वार अतिशय छोटे आहे. स्थानिक शिकाऱ्यांनी हे पाहिले असेल आणि वाघिणीला गुहेत अडकवून ठेवण्यासाठी बांबू आणि इतर साहित्यासह त्यांनी गुहेच्या प्रवेशद्वारावर आग लावली. ती वाघीण मेली आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी त्यांनी तीक्ष्ण हत्यारांनी तिच्या शरीरावर जखमा केल्या. ती मेल्याची खात्री केल्यानंतर तिचे दोन्ही पंजे कापून नेले.
दरम्यान, वनरक्षकाने ही माहिती वरिष्ठांना दिली. यावेळी विभागीय वनाधिकारी (वन्यजीव)सुभाष पुराणिक, मुकु टबन वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.जी. वारे, मुख्य वनसंरक्षक वन्यजीव प्रकाश महाजन, मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमजान विरानी, घटनास्थळी पोहोचले. सुमारे चार वर्षीय वाघिणीच्या गळ्यात ताराचा फास अडकलेला दिसून आला. परिसरात बांबूच्या काड्या, क्लच वायर आणि जाळल्याच्या खुणा आढळून आल्या.
गर्भवती वाघिणीच्या पोटात चार बछडे होते. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोंड, वणीचे डॉ. अरुण जाधव, झरीचे डॉ. एस.एस. चव्हाण, मुकु टबनचे डॉ. डी.जी. जाधव, मारेगावचे डॉ. व्ही.सी. जागडे यांनी शवविच्छेदन केले. आरोपींचा शोध सुरू असल्याचे संबंधित वनाधिकाऱ्यांनी सांगितले.