संपादकीय
चंद्रपूर - वर्ष 2020 या काळात जगात कोरोना नामक विषाणूने प्रवेश केला, आरोग्य व्यवस्था पार कोलमडून गेली, लाखो नागरिक कोरोनामुळे मरण पावले.
या उद्रेकानंतर सुद्धा देशात निवडणूका झाल्याचं, नागरिकांप्रती असलेली संवेदनशीलता राजकारणी लोक अक्षरशः गमावून बसले.
नंतर वर्ष 2021 या कोरोनाचा तर उद्रेक सुरू झाला, आरोग्य व्यवस्था पूर्णपणे हतबल झाली, ऑक्सिजन व बेड अभावी नागरिक मृत्यूच्या दाढेत जात आहे.
पण ही परिस्थिती 2 दिवसात उदभवली नाही, आरोग्य व्यवस्था पुन्हा चांगल्या पद्धधतीने उभी राहू शकली असती मात्र तसे काही झाले नाही.
चंद्रपुरात कोरोना विषाणू झपाट्याने पसरत आहे, एकेकाळी उपचार घेणाऱ्यांची संख्या 82 पर्यंत पोहचली, त्यानंतर या कोरोना विषाणूने डोके वर काढले व आजच्या घडीला उपचार घेणारे 14 हजारांच्या वर पोहचले.
पालकमंत्री, खासदार, व जिल्ह्यातील आमदार नागरिकांना चांगल आरोग्य उपचार देण्यापासून पूर्णपणे अयशस्वी ठरले.
विदर्भात ज्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता त्यावेळी कडक निर्बंध लावून चांगली आरोग्य व्यवस्था उभारू शकले असते मात्र तसे न करता, नागरिक रोज मृत्यूच्या दाढेत जात असताना वेळेवर सुचलेले शहाणपण आपल्या जिल्ह्यातील जनप्रतिनिधी यांनी केलं आहे.
पालकमंत्री वडेट्टीवार यांना याबाबत विचारणा केली तर आम्हाला भावना व वेदना आहे अशी ओरड करतात मात्र ज्यांचे वडील, काका, आजोबा, आई, बहीण, भाऊ मरण पावत आहे त्यांना भावना नाहीत का? याचा विचार करायला हवा पालकमंत्री यांनी.
कोरोनाच्या विक्राळ महामारीत जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याबाबत सजग रहावे अस असताना खासदार धानोरकर हे कुटुंबियांसोबत कर्नाटक ला राजभाषा समितीच्या बैठकीला गेले, आपल्याला खासदार बनविणारी जनता ऑक्सिजन व बेड अभावी मरत आहे आणि आपण बैठकीला जात आहात, ही कुठली माणुसकी आहे साहेब.
नागरिकांना आज या महामारीतून वाचविण्यासाठी चांगल्या आरोग्य उपचाराची गरज आहे मात्र प्रशासन व जनप्रतिनिधी यावर गंभीर नाही.
चंद्रपूर महानगरपालिका तर कोरोना काळात साधे कोविड सेंटर सुरू करू शकले नाही, वर्ष 2020 मध्ये कोविड रुग्णांना डब्बा पोहचविण्याचा कामात पालिकेद्वारे घोटाळा करण्यात आला, डब्बा घोटाळा प्रकरण त्यावेळी चांगलेच गाजले होते.
आज घडीला नागरीक उपचाराविना मरत आहे आणि पालिका विविध प्रभागात लाखोंचे स्वागत गेट उभारण्यात व्यस्त आहे, आमदार जोरगेवार यांनी कोविड सेंटर साठी आमदार निधीतून 1 कोटींचा निधी दिला, मात्र त्यावर स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी आक्षेप घेत 1 कोटी मध्ये कोविड सेंटर उभे राहणार का असा प्रश्न उपस्थित केला.
कारण जर आमदारांनी दिलेल्या 1 कोटीमधून कोविड सेंटर सुरू झाले तर त्याचे संपूर्ण श्रेय आमदार जोरगेवार यांना मिळणार जर असे नाही झाले तर मनपा कोरोना काळात निष्क्रिय झाली असा ठपका त्यांच्यावर लागणार, असा पेच मनपासमोर निर्माण झाला आहे.
स्वतः काही करू शकत नसताना असले राजकारणी टीका टिप्पणी करण्यात व्यस्त आहे, आज नागरिकांना उपचाराची गरज आहे राजकारणाची नाही.
मनपा नागरिकांकडून अवाढव्य कर घेत असते त्या बदल्यात नागरिकांसाठी चांगली आरोग्य व्यवस्था उभारू शकत नसेल तर पालिकेचा काय उपयोग?
महानगर भाजप तर्फे शहरात विविध भागात मोठे बॅनर लावून आपल्या कार्यकर्ते यांचे दूरध्वनी क्रमांक नागरिकांना देत कोविड रुग्णांना मदतीसाठी हाक द्या अशी प्रसिद्धी केली मात्र दररोज त्यांना हजारो नागरिक संपर्क साधत असून आरोग्य व्यवस्था हतबल असल्याने कुणाचीही व्यवस्था करण्यात महानगर भाजप अपयशी होत आहे.
जिल्हाधिकारी गुल्हाने सुद्धा आपल्या कक्षात बसून अधिकाऱ्यांना सूचना देतात, मागील जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी कोरोना काळात प्रत्यक्ष नागरिकांच्या समस्या जाणत भेटी घेतल्या मात्र गुल्हाने यावर काहीच करू शकले नसल्याने, समाजमाध्यमांवर जिल्हाधिकारी हटाव अशी मोहीम सुरू झाली.
माजी खासदार हंसराज अहिर यांनी जिल्ह्यातील वेकोली रुग्णालयाना भेटी देत सीएमडी मनोज कुमार यांना जिल्ह्यातील सर्व वेकोली रुग्णालयात बेड वाढविण्या संदर्भात विनंती केली, त्यांची विनंती मान्य करण्यात आली.
घुग्गुस येथे 56 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले मात्र त्यावर खासदार समर्थक यांना चांगलीच मिरची लागल्याने, माजी खासदार श्रेय घेत असल्याचा आरोप त्यांचेवर करण्यात येत आहे.
ते सेंटर कुणाच्याही मागणीमुळे सुरू झाले असेल पण त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे मग त्यावर राजकारण करून खासदार समर्थकांना काय फायदा?
आजच्या घडीला बालरोग तज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी गृह विलीगिकरणात असलेल्यांसाठी निःशुल्क मार्गदर्शन व मदत केंद्र सुरू केले, मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी स्वतःचे ऑक्सिजन युक्त चारचाकी वाहन कोविड रुग्णांना ने-आण करण्यासाठी उपलब्ध केले.
MIM च्या वतीने नागरिकांना घरपोच ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात येत आहे.
मात्र काही नागरिक या कोरोनाचा फायदा घेत रेमडीसीविर चा कालाबाजार करीत आहे, 950 रुपयांचे रेमडीसीविर 40 ते 50 हजार रुपयांना मिळत आहे.
खाजगी एम्ब्युलन्स ने शहरात दुसऱ्या दवाखान्यात जाण्यासाठी 3 ते 5 हजार रुपये घेत आहे तसेच नागपूर व हैदराबाद जाण्यासाठी हे खाजगी एम्ब्युलन्स चालक 50 ते 75 हजार रुपये हतबल नागरिकांकडून वसुल करीत आहे
मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे.
यावेळी तरी निदान सर्व जनप्रतिनिधी, सामाजिक व सेवाभावी संस्था यांनी एकत्र येत कोरोना विरोधात एकजुटीने उभे राहत नागरिकांना मदत करावी, राजकारण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य पडले आहे, कमीतकमी हा काळ नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात यावा.