चंद्रपूर - कांग्रेसचे मनपा नगरसेवक नंदू नागरकर यांनी स्थानिक पालकमंत्री, खासदार यांना घरचा आहेर देत, चंद्रपुरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत तात्काळ नियोजन करावे अन्यथा बेमुदत अन्नत्याग आंदोलन 19 एप्रिलपासून राहत्या घरी करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
केंद्र, राज्य व चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आज नागरिकांवर महामारीची परिस्थिती ओढावली असून प्रशासन मात्र हतबल झाल्यासारखे वागत आहे.
आज कोरोना महामारीत चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना बेड मिळत नाही, अपुरा आरोग्य कर्मचारी वर्ग, रेमडीसीविर इंजेक्शन व प्रशासनाचे शून्य नियोजनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
कोरोनामुळे मृतकांचा आकडा वाढत आहे, स्मशानभूमीत मृतदेहांच्या रांगा लागत आहे, प्रशासनाने तात्काळ यावर उपाययोजना करायला हवा मात्र तसे काही होताना दिसत नाही, याचा फायदा खाजगी रुग्णालय उचलत असून रुग्णांची अक्षरशः पिळवणूक होत आहे.
सध्या जिल्हा प्रशासन व चंद्रपूर महानगरपालिका यांनी एकत्र येऊन चंद्रपूरच्या जनतेसाठी 500 बेडचं कोविड हॉस्पिटल सुरू करून नागरिकांची पिळवणूक थांबवावी अन्यथा 19 एप्रिल पासून कांग्रेसचे माजी शहर अध्यक्ष नगरसेवक नंदू नागरकर हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन राहत्या घरून करणार आहे.
वेळ का होईना मात्र शहरातील नगरसेवकाने पुढाकार तरी घेतला, आज या महामारीच्या काळात पण कांग्रेसचे खासदार बाळू धानोरकर दिसेनासे झाले आहे, चंद्रपूरच्या जनतेचे पालकत्व स्वीकारणारे पालकमंत्री सुद्धा जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर नाही तर यांना जनप्रतिनिधी म्हणण्याचा अधिकार काय? हे नागरिकांनी समजायला हवे.
काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार हंसराज अहिर यांनी जिल्ह्यातील जनतेला योग्य उपचार व सुविधा मिळाव्या यासाठी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे दिले, त्यानंतर चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी अकार्यक्षम चंद्रपूर मनपाला कोविड सेंटर सुरू करण्यासाठी 1 कोटींचा निधी दिला.