चंद्रपूर : चंद्रपूर सारख्या कोरडया वातावरणाच्या हवामानात व खासकरुन असह्य उन्हाळयात वीजेशिवाय जगणे कठीण होवून बसते. महावितरणचे कर्मचारी व अधिकारी याची जाणिव ठेवून वीजेसारखी अत्यावश्यक सेवा सर्व ऋतुत सर्व परिस्थितीत सुरळीत व अखंडित ठेवण्यात सतत प्रयत्नरत असतात.आता मात्र कोरोनाही महावितरणच्या कर्मचारी व अधिकारी यांची कसाेटी पाहात असून त्याही परिस्थितीत कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत.
महावितरणच्या नियमित तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वीजेची सेवा देतांना स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे तसेच कोविड प्रतिबंधक लस ताबडतोब घ्यावी, असे चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील १० कर्मचारी संघटनांच्या सुमारे २० पदाधिकाऱ्यांशी व्हीडीओकॉन्फरन्सिंगद्वारे मंगळवार दिंनाक २० एप्रिल २०२१ रोजी संवाद साधत आवाहन केले. याप्रसंगी चंद्रपूर परिमंडळातील अधिकारी, अभियंते हे उपस्थित होते. सर्व संघटनाप्रतिनिधींनी याप्रसंगी केलेल्या सुचना व प्रस्ताव ऐकून घेत त्यावर योग्यपणे अंमल करण्यात येईल असे मुख्य अभियंता यांनी सांगितले
विदर्भात कोरोनाने थैमान घातले असून महावितरण चंद्रपूर परिमंडळात ४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
मार्च २०२० ते आज २ एप्रिल २०२१ पर्यंत चंद्रपूर परिमंडळातील १४३ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी ६५ कोरोनामुक्त झाले असून सद्यस्थितीत ७४ कर्मचारी रुग्णालय व घरी उपचार घेत आहेत तर ४ सहकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
कोरोनाची दुसरी लाट ही सर्व वयोगटांसाठी मोठी धोकादायक आहे. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी तसेच ग्राहकसेवेचे व्रत निभावताना स्वतः च्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य द्यावे.
चंद्रपूर परिमंडळातील कार्यरत १८८३ नियमित तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २५३ कर्मचाऱ्यांनी करोनाची लस घेतली आहे. येत्या दोन आठवडयात जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी कार्यालय प्रमुख व मानव संसाधन अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्य अभियंता यांनी दिले. तसेच कोरोना पासून बचाव करण्यासाठी मास्कचा नियमित वापर, हात नेहमी व वारंवार सॅनिटाईझ् करणे आणि ६ फुटाचे सुरक्षित अंतर या त्रिसूत्रींसह नियमित वाफ घेणे या सूत्रांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी सर्व उपस्थित संघटना प्रतिनिधी, अधिकारी, अभियंते व त्यांच्या माध्यमातून सर्व कर्मचारी यांना केले. परिमंडलस्तरावर कोरोना समन्वय कक्ष कार्यरत असून त्याद्वारे कर्मचारयांना येणारया विविध अडचणींची सोडवणूक तत्परतेने करण्याचे निर्देश मुख्य अभियंता यांनी दिले.