ताजी बातमी - बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील एक मोठे नाव आणि अनेक महत्त्वाच्या स्पर्धा जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे कोरोनामुळे आज निधन झाले. ते ३४ वर्षांचे होते. जगदीश लाड यांच्या निधनाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. बॉडीबिल्डींग क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. जगदीश यांनी प्रचंड मेहनतीने शरीरयष्टी कमावली होती.
जगदीश लाड हे फिटनेस बाबत अत्यंत जागरुक आणि दक्ष होते.
फोटोकडे पाहिल्यानंतर कोरोना व्हायरस किती घातक आहे, त्याची कल्पना येते. जगदीश लाड मूळचे नवी मुंबईचे, व्यवसायाच्या निमित्ताने ते आता बडोद्यामध्ये स्थायिक झाले होते. त्यांनी बडोद्यात मागच्यावर्षी जीम सुरु केली होती. तिथे ते तरुणांना व्यायामाचे धडे द्यायचे. काही दिवसांपूर्वी जगदीश यांना कोरोनाची लागण झाली होती. अखेर आज त्यांचे निधन झाले.
जगदीश लाड यांनी दोन वेळा नवी मुंबई क्षेत्र श्री, एकवेळा नवी मुंबई महापौर श्री, तीन वेळा महाराष्ट्र श्री चा किताब जिंकला होता. मिस्टर इंडिया स्पर्धेत एक सुवर्णपदक जिंकलं होतं. मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्राँझ पदकाची कमाई केली होती. आपल्या पिळदार शरीरयष्टीने जगदीश लाड लगेच सगळ्यांचे लक्ष वेधून घ्यायचा. त्यांच्या निधनामुळे बॉडी बिल्डींग विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे.