नागपूर - नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देऊन मॅनेजरने एका महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केला. तिचे वारंवार लैंगिक शोषण केले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सुशांत सुखदेव पात्रा (३६, बंगाली कॅम्प, उत्तमनगर, चंद्रपूर) असे आरोपी मॅनेजरचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३५ वर्षीय तरुणी गेल्या १० वर्षांपूर्वी पूर्ती बाजार येथे नोकरीला लागली. नोकरी करीत असताना मॉलचा मॅनेजर सुशांत पात्रा याच्याशी तिची ओळख झाली. सोबत काम करीत असल्यामुळे सुशांतने तिला मोबाईल क्रमांक घेतला. त्याने तिच्याशी चॅटींग करणे सुरू केले.
काही महिन्यानंतर दोघांची मैत्री झाली.
सुशांतने तिला नोकरीवरून काढण्याचे मालकाचे आदेश असल्याची बतावणी केली. बेरोजगार होण्याच्या भीतीपोटी ती सुशांतला मदत मागत होती. कुठे जॉब शोधण्याची विनंती करीत होती. शेवटी त्याने तिच्या गरजेचा फायदा घेतला. शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तरुणीने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे तिला नोकरीवरून काढण्याची नोटीस देण्यात आली.
आर्थिक अडचण लक्षात घेता तिने सुशांतशी शारीरिक संबंधासाठी होकार दिला. त्याने तिला हॉटेलवर नेत बलात्कार केला. त्यानंतर तो वाटेल तेव्हा तिला शारीरिक संबंधाची मागणी करीत होता. नकार दिल्यास नोकरीवरून काढण्याची धमकी देत होता. दरम्यान तिचे लग्न झाले. त्यानंतरही तो तिच्यावर बळजबरी करीत होता. सलग १० वर्षे त्याचा लैंगिक अत्याचार या तरुणीने सहन केला.
तरुणीचे लग्न ठरल्यानंतर तिने संबध कायम ठेवण्यास नकार दिला. परंतु, त्याने पतीला सांगून संसार तोडण्याची धमकी दिली. तिला मुलगी झाली. तिने नोकरी सोडण्याचा विचार केला. परंतु, त्याने पतीला भेटून सर्व सांगितले. त्यामुळे पतीने तिला सोडून दिले. त्यानंतर त्याने लग्नाचे आमिष दाखवले. मात्र, दुसऱ्याच तरुणीसोबत लग्न केले. फसगत झाल्यामुळे महिलेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
