ताजी बातमी - राज्यात काल रात्रीपासून कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विरळ झाली होती. तर अनेक ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले होते. लॉकडाऊन लावूनही लोकांची गर्दी कमी होत नसल्याने राज्य सरकार निर्बंध आणखी कडक करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास सामान्यांना पेट्रोल, डिझेल दिले जाणार नाही.
राज्याचे मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याचे संकेत दिले आहेत. राज्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी कडक होताना दिसत नाही.
त्यामुळे दोन दिवसांत निर्बंध वाढविले जाणार आहेत. सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल दिले जाणार नाही. तहसीलदारांनी पत्र दिल्यानंतरच फक्त अत्यावश्यक सेवेसाठी इंधन दिले जाईल. त्याबाबत सरकार विचार करत असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.
लोकल सेवेचा वापर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच करता येणार आहे. इतरांनी वापर केल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. लोकल सेवा वापराबाबत कडक निर्बंध करावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याचे वडेट्टीवार म्हणाले. परप्रांतीय कामगारांना घरी जाण्यासाठी सूट दिली आहे. त्याचा फायदा घेत खासगी आणि सार्वजनिक वाहतूक केली जात आहे. आम्ही आणखी एक दिवस जनतेला विनंती करत आहोत. अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.