सोलापूर - राज्यभरात थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत. डॉक्टर, नर्सेस, प्रशासन प्रचंड मेहनत करुनही हे संकट आता जात भयानक होताना दिसत आहे. विशेष म्हणजे रुग्णांसाठी आता रेमडेसिव्हीर इंजेक्शन, पुरेसं ऑक्सिजन मिळत नसल्याने प्रचंड भयावर परिस्थिती आहे. या परिस्थितीला सामोर जाणाऱ्या एका पत्रकाराने हवालदिल होऊन स्वत:चं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतक पत्रकाराला कोरोनाची लागण झाली होती. तो होमक्वारंटाईन राहून उपचार घेत होता. पत्रकाराने या आजारामुळे नैराश्यात जाऊन हाताची नस कापून आत्महत्या केली. या पत्रकाराचं नाव प्रकाश जाधव असं आहे. ते 35 वर्षांचे होते.
प्रकाश यांच्या वडिलांचं दोन दिवसांपूर्वीच कोरोनामुळे निधन झालं होतं. तर त्यांच्या आई देखील कोरोनाबाधित आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या आईला उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळावे, यासाठी प्रकाश यांनी भरपूर फेऱ्या मारल्या. मात्र, तरीदेखील इंजेक्शन मिळाले नसल्याचं समोर आलं आहे. प्रकाश यासर्व कारणांमुळे प्रचंड नैराश्यात गेले होते. या नैराश्यात त्यांनी सुशील नगर येथील त्यांच्या राहत्या घरात स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्या केली.
प्रकाश जाधव यांनी 2018 मध्ये काही काळापुरता ‘दैनिक सुराज्य’मध्ये कामास होता. त्यानंतर त्यांनी आणखी एका दैनिकात काही दिवस काम केले होते. यापूर्वी ते जनता सहकारी बँकेत काम करायचे. काही कारणाने त्यांनी ते काम सोडले होते. त्यांचे वडील कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांची आई सध्या कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.