चंद्रपूर - कोरोना काळात अनेकजण या विषाणूचा फायदा घेत आहे, रेमडीसीविर इंजेक्शन असो की एम्ब्युलन्स सेवा आता तर सिटी स्कॅन करणारे सुद्धा रुग्णांकडून शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार पैसे न घेता जादा रक्कम घेत आहे.
असाच एक प्रकार चंद्रपूर शहरात 26 एप्रिलला उघडकीस आला.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांना शहरातील माडूरवार सिटी स्कॅन सेंटरमध्ये रुग्णांकडून पैश्याची लूट होत असल्याची तक्रार प्राप्त झाली.
संदीप गिर्हे यांनी युवासेना जिल्हा समन्वयक विक्रांत सहारे यांना याबाबत डॉक्टरांना विचारपूस करून रुग्णाला न्याय देण्याची जबाबदारी सोपविली.
सहारे यांनी माडूरवार सिटी स्कॅन सेंटर मध्ये कार्यकर्त्यांसह धडक दिली व याबाबत डॉक्टरांना विचारणा केली, की शासनाने 2.50 ते 3 हजार रुपयांपर्यंत सिटी स्कॅन दर निर्धारित केले असताना रुग्णांकडून 10 हजार रुपये का घेतले? असा प्रश्न सहारे यांनी डॉक्टरांना विचारला, डॉक्टरांनी आपली चूक मानत रुग्णाला 5 हजार रुपये परत केले.
पीडित रुग्णाने शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व युवासेना जिल्हा समनव्यक सहारे यांचे आभार मानले.
यावेळी सूचित पिंपलशेंडे व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोना काळात "आपदा मे अवसर" च्या नावाने रुग्णांकडून पैसे लुटण्याचा गोरखधंदा काही जणांतर्फे सुरू असून सर्वसामान्य नागरिक याला बळी पडत आहे.
शासनाने सिटी स्कॅन सेंटर धारकांना दराचे फलक सेंटर बाहेर लावण्यास सांगितले मात्र शासनाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवून रुग्णाला लुटण्याचा प्रकार सध्या सुरू आहे, हे कुठंतरी थांबायला हवे, रुग्णांकडून कुणीही जादा पैसे आकारले असतील तर शिवसेना कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन विक्रांत सहारे यांनी केले आहे.