चंद्रपूर - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्य सरकारने 25 दिवसांचा मिनी लॉकडाउन घोषित केलेला आहे.
मात्र हा लॉकडाउन पूर्वसूचना न देता लागू केल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
4 तारखेला मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना म्हटले की आठवड्यातून शनिवार व रविवारी कडक लॉकडाउन असेल मात्र लिखित आदेश ज्यावेळी शासनाला प्राप्त झाला त्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण दुकाने बंद ठेवण्याचे निर्गमित करण्यात आले होते.
सरळ 25 दिवसांचा लॉकडाउन करण्यात आल्याने व्यापारी वर्गात सुद्धा संभ्रम निर्माण झाला, 25 दिवस जर संपूर्ण प्रतिष्ठाने बंद असणार तर याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार, राज्य सरकारच्या या निर्णयावर चंद्रपूर व्यापारी मंडळाने नाराजी व्यक्त केली.
जर सरकारला लॉकडाउन लावायचा होता तर तसे स्पष्ट आदेश द्यायला हवे होते, मात्र त्यांनी कसलाही विचार न करता आदेशातील शब्द पूर्ण बदलवून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला.
टाळेबंदीत सकाळी 11 ते 5 या वेळेत दुकाने चालू ठेवण्यास परवानगी द्यायला हवी होती, जेणेकरून कुणाचाही रोजगार महिनाभर बुडाला नसता, या लॉकडाउनने आधीच हातावर काम करणारे खचून गेले आहे, कोरोनाने हे नागरिक नंतर तर आर्थिक खच्चीकरणाने आधी मरतील.
चंद्रपूर व्यापारी मंडळाचे सदस्य रामकिशोर सारडा यांनी सांगितले की हा संभ्रमित लॉकडाउन न झेपणारा आहे, आम्ही सरकार सोबत आहो, सरकारच्या निर्णयाला आमचा सुद्धा पाठिंबा आहे मात्र शासकीय, निमशासकीय, जीवनावश्यक दुकाने सुरू ठेवून जर परिस्थिती नियंत्रणात येत असेल तर आम्ही सुद्धा सर्व निर्बंधांचे पालन करणार आहोत.
सामान्य नागरिकांप्रमाणे आम्हाला सुद्धा कुटुंब आहे, सरकारने सर्वांचा विचार करून निर्णय घ्यायला हवा, जर दुकाने उघडल्यास प्रशासन कारवाई करेल तर आम्ही प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहोत, निर्बंध लादायचे असतील तर पूर्ण निर्बंध लादा.
अन्यथा सोमवारी आम्ही कोणत्याही परिस्थितीत दुकाने उघडणार, प्रशासन काय कारवाई करेल ते आम्ही सहन करू.
चंद्रपूर व्यापारी मंडळाच्या या निर्णयाला जिल्ह्यातील 34 संघटनांचा पाठिंबा आहे.
आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रपूर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष रामजीवन परमार, सचिव प्रभाकर मंत्री, एमआयडीसी अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, रामकिशोर सारडा व शहरातील व्यापारी उपस्थित होते.
