गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराच्या मध्यभागी असलेल्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या डस्ट प्रदूषणामुळे मागील एक वर्षापासून शहरवासी त्रस्त झाले आहे.या प्रदुषणाचा फटका विशेषतः साईशांती नगरातील रहिवासीयांना बसत आहे.अशी परिस्थिती असताना कंपनीच्या डस्टमुळे एकीकडे शहरवासीयांना विवीध रोगांची लागण होत आहे तर दुसरीकडे स्थानिक नगरपरिषद नगराध्यक्ष,उपाध्यक्ष व सत्ताधारी नगरसेवकांनी अक्षरशः डोळेझाक केल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे. माणिकगड सिमेंट कंपनीच्या डस्ट संदर्भात ठराव घ्या अशी मागणी साईशांती नगरवासीयांनी गेल्या तीन महिन्यापूर्वी नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र याला केराची टोपली दाखवण्यात आली. अखेर नगरपरिषदेला माणिकगड सिमेंट कंपनीचा ऐवढा पुळका का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मागील वेळेस सभेत सदर विषय घेतला नसल्यामुळे साईशांती नगरातील महिलांनी पुन्हा ३० मार्च रोजी नगराध्यक्षा,उपाध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच सर्व सभापती, नगरसेवकांना निवेदन देऊन पुढच्या सर्वसाधारण सभेत कंपनीच्या डस्ट प्रदूषणा बाबतचा ठराव विषय सूचित घेऊन बहुमताने मंजूर करण्याची विनंती वजा मागणी केली आहे.अन्यथा सभेच्या दिवशी नगरपरिषद समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.साईशांती नगरातील महिला निवेदन देण्यास गेले असता नगराध्यक्षांची भेट झाली नसल्याची माहिती असून निवेदन स्वीकारताना मात्र मुख्याधिकारी यांनी सकारात्मक उत्तर देत म्हटले की "येणाऱ्या सभेत विषय ठेवते,आपण नगराध्यक्षांना भेटा"
येणाऱ्या सभेत जर विषय ठेवला नाही व ठराव मंजूर करण्यास टाळाटाळ झालीच तर नगरपरिषद समोर आंदोलन करणार असल्याचे साईशांती नगरवासीयांनी म्हटले आहे.यावेळी गडचांदूर न.प.माजी नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे,लता ठावरी, मनीषा इसनकर,कल्पना जोगी, शारदा क्षीरसागर, प्रभा पाणघाटे,माधूरी रासेकर, प्रीती मिननेवार,सुवर्णा कावटकर,वैशाली पोतनूरवार, आशा आत्राम,रीना अलोने, वर्षा आत्राम, अनुसया गायकवाड,शालू टोंगे इत्यादी साईशांती नगरातील महिलांची उपस्थिती होती. गडचांदूरकरांचे आरोग्य व हितांचे गोडवे गाणारे स्थानिक नगरपरिषदेचे सत्ताधारी येणाऱ्या सभेत माणिकगड सिमेंट कंपनीच्या डस्ट प्रदूषणा विषयी ठराव घेतील का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
