गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर शहराच्या मध्यभागी असलेल्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या डस्टमुळे शहरवासी विशेषतः साईशांती नगरवासी अक्षरशः हैराण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. घरांच्या छतांवर व घरात परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले असून डस्टमुळे कित्येक नागरिक विविध रोगांनी ग्रासले आहे.प्रदुषण नियंत्रण मंडळाची भूमिका संशयास्पद बनली असून नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे. माणिकगड सिमेंट कंपनीचा डस्ट नागरिकांच्या जिव्हारी लागला असून एकीकडे शासन या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांचे जीव वाचवण्यासाठी धडपडत आहे तर दुसरीकडे याठिकाणी माणिकगड सिमेंट कंपनीच्या डस्टमुळे लोकांना जीव गमावण्याची वेळ आली आहे.सुरू असलेला डस्टचा वर्षाव वेळीच थांबला नाही तर आम्ही गप्प बसणार नाही आणि यापुढे काय पाऊल उचलायचे हे आमचे आम्हीच ठरवू असे मत गडचांदूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी डोहे यांनी "News34" पुढे व्यक्त केले आहे.तसेच नगरसेवक अरविंद डोहे यांच्या नेतृत्वात प्रभाग २ साईशांती नगरच्या महिला पुरुष व तरूणांनी यासंबंधीचे निवेदन कोरपना तहसीलदारांना दिले आहे.
सदर कंपनीतून नेहमीच कणीदार धुर निघत असतो. यामुळे नागरिकांना विशेषतः लहान-लहान मुलांच्या आरोग्यावर याचे विपरित परिणाम होत आहे.विविध प्रकारच्या रोगांची लागण होत असून परिसरातील शेत पिकांचे सुद्धा मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. मात्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने याविषयी अघोषित डोळेझाक केल्याचे आरोप होत आहे.याबाबत जिल्हा प्रदूषण विभागाकडे अनेकदा तक्रारी करून व प्रत्यक्ष भेटून सुद्धा सदर कंपनी विरोधात कुठलीच कारवाई झालेली नाही.अशा मुजोर कंपनीवर जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ कुठलीच कारवाई करत नसल्यामुळे साईशांती नगरवासी आक्रमक झाल्याचे चित्र असून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे अधिकारी व कंपनी विरोधात कठोर कारवाई करावी,डस्टचा वर्षाव कायमचा बंद करावा अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी माणिकगड सिमेंट कंपनी व जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळा विरूद्ध घोषणाबाजी करून साईशांती नगरवासीयांनी तीव्र राग व्यक्त केला आहे. डस्टची समस्या लवकरात लवकर निकाली काढण्यात आली नाही तर भविष्यात मोठे आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता संबंधित विभाग याविषयी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
