चंद्रपूर - जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांबद्दल शासनाचे धोरण हे उदासीन असून किमान वेतन कायद्याला केराची टोपली दाखविण्याचे काम जिल्हा प्रशासन करीत आहे.
गोंडपीपरी नगरपंचायत येथे कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यापासून वंचित करण्याचे काम कंत्राटदार करीत असून सहायक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात झालेल्या निर्णयाचे पालन कंत्रातदारातर्फे होत नाही आहे.
जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचा थकीत वेतन किमान कायद्याप्रमाणे देण्यास कंत्राटदाराने नकार दिला आहे.
या विरोधात गोंडपीपरी येथील सफाई कामगार कर्मचारी 17 मार्चपासून आमरण उपोषणाला बसणार आहे अशी माहिती जय भवानी कामगार संघटनेचे अध्यक्ष सूरज ठाकरे यांनी दिली. #News34
जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालिका येथे कंत्राटी कामगारांबद्दल विविध कामावर घेण्यासाठी किमान वेतन कायद्याचा उल्लेख निविदे मध्ये करण्यात यावा जेणेकरून कामगार किमान वेतन कायद्यापासून वंचित राहणार नाही.
चंद्रपूर जिल्ह्यात विजय वडेट्टीवार हे पालकमंत्री व खासदार बाळू धानोरकर यांच्यासारखे नेते असून सुद्धा किमान वेतन कायद्याची पायमल्ली होत आहे, जिल्ह्याची दारूबंदी उठविण्यासाठी पालकमंत्री वडेट्टीवार ज्याप्रमाणे ताकद लावत आहे तशीच ताकद कंत्राटी कामगारांना न्याय देण्यासाठी लावावी, पालकमंत्री व खासदार हे कामगारांप्रती उदासीन आहे, त्यांच्या पत्राला सुद्धा अधिकारी केराची टोपली दाखवितात असा आरोप सूरज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत लावला.
