चंद्रपूर - 6 जानेवारीला गोंदियावरून पुण्याला जाणाऱ्या खाजगी बसमध्ये 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग करीत बलात्कार करण्यात आला होता, त्या घटनेला महिना उलटताच चंद्रपूर जिल्ह्यातील 20 वर्षीय मुलीसोबत खाजगी बस वाहकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना 28 फेब्रुवारीला उघडकीस आली.
सदर तरुणी शासकीय नोकरीच्या संदर्भात चाचणी असल्याने 17 फेब्रुवारीला पुण्यात गेली होती नंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करीत ती तरुणी 25 फेब्रुवारीला पुण्यातून चंद्रपूरला जाणारी DNR या खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये बसली. (News34)
रात्री 9 वाजताच्या सुमारास जेव्हा ही बस जालना येथे पोहचली असता बसमधील वाहक मंगेश रामरतन साखरवाडे यांनी त्या तरुणीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत, त्या तरुणीला मोबाईल क्रमांक विचारत मला तुझ्याशी पर्सनल बोलायचे आहे, बसमध्ये पॅसेंजर असल्याने मी बोलू शकत नाही असे म्हणत तो त्या तरुणीच्या मागे मागे जाऊ लागला.
अचानक घडलेल्या या प्रकाराने ती तरुणी घाबरून गेली, रात्रभर मंगेशने त्या तरुणीच्या मोबाईलवर कॉल केले, त्यानंतर तरुणीने आपल्या भावाला हा घटनाक्रम सांगितला असता त्यांनी कॉन्फरन्स कॉल वर मंगेशला चांगलेच धारेवर धरले. मात्र त्यानंतर तो न घाबरता तरुणीच्या मोबाईलवर वारंवार फोन करीत होता.
26 फेब्रुवारीला DNR ट्रॅव्हल्स चंद्रपूरला पोहचली असता मंगेश पुन्हा त्या तरुणी जवळ जात मला तुमच्याशी पर्सनल बोलायचे होते पण तुम्ही भावाला सांगितले, त्यानंतर मंगेशने तरुणीला हातवारे करीत इशारे करू लागला.
2 दिवस त्या तरुणीचं मानसिक स्वास्थ खचून गेले होते, नंतर हा सर्व प्रकार तिने आपल्या आई वडिलांना सांगितला.
हा प्रकार दुसऱ्या कुणासोबत होऊ नये यासाठी ती तरुणी समोर आली व शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांना घडलेला प्रकार सांगितला.
तात्काळ या प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशनला करायला लावली मात्र पोलिसांनी सुद्धा त्या तरुणीची आधी तक्रार न घेता अक्षरशः DNR ट्रॅव्हल्स मालकांना फोन केला, आम्ही आपलं प्रकरण निपटवू तुम्ही तक्रार करू नका असे त्या तरुणीला महिला अधिकाऱ्याने सांगितले.
इतकेच नव्हे तर तरुणीसोबत आलेल्या तिच्या भावाला दम सुद्धा दिला.
मात्र रामनगर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार रोशन यादव यांनी तात्काळ तरुणीच्या तक्रारीची दखल घ्यायला सांगितले असता DNR ट्रॅव्हल्सच्या वाहकावर कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तरुणीला पोलीस स्टेशनमध्ये झालेला नाहक त्रास व 4 तासानंतर गुन्ह्याची नोंद झाल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन देणार आहे.
राज्यात वाढत असलेले महिलांवर अत्याचाराचे प्रकरण बघता पोलिसांनी तात्काळ त्या तरुणीच्या तक्रारीची नोंद घ्यायला हवी होती मात्र काही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभार व आरोपी विषयी असलेली सहानुभूती बघता तक्रार लवकर घेण्यात आली नाही.
राज्यात 6 जानेवारीला धावत्या बसमध्ये चाकूचा धाक दाखवीत 24 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला, त्या घटनेनंतर तरुणीची मानसिक स्थिती खराब झाली होती, त्या प्रकरणांनातून तरुणीने स्वतःला सावरत गुन्हा दाखल केला.
या प्रकरणात मात्र तरुणीच्या तक्रारीची दखल घ्यायला कुणी नव्हते, अत्याचार झाल्यावर पोलीस जागी होणार का? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे.
खरंच DNR सारखी खाजगी बस ही महिलांसाठी सुरक्षित आहे का? यामधून महिला व मुलींनी प्रवास करावा का? याचा विचार नागरिकांना करण्याची गरज आहे.
आज विनयभंग झाला उद्या मोठा गुन्हा घडू शकतो त्याला जबाबदार कोण असणार, ह्या घटना होण्यापूर्वी त्याला थांबविणे गरजेचे आहे.
दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात अत्याचाराच्या घटना घडल्या की महिला संघटना तात्काळ जागे होत निषेध करतात मात्र जिल्ह्यात घडलेल्या घटनांवर या महिला संघटना जातात तरी कुठे? हे कधी न समजणारे कोडे आहे.