गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तहसीलदार व पुरवठा विभागाच्या बेजबाबदार व अडवणुकीच्या धोरणामुळे गेल्या वर्षभरापासून तालुक्यातील अनेक गोरगरीब कुटुंबांना अन्नधान्यापासून वंचित राहावे लागले आहे.१८ मार्च २०२१ रोजी आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची पहिली बैठक होणार असून यात सर्व पात्र गोरगरीब कुटूंबांच्या शिधापत्रिका अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करून धान्य उपलब्ध करून देण्याची मागणी नांदा ग्रामपंचायत सदस्य अभय मुनोत यांनी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे केली आहे.
कोरपना तालुक्यात कित्येक गोरगरीब गरजू कुटूंबांनी नव्याने शिधापत्रिका काढून विहीत नमुन्यात उत्पन्न दाखल्यासह अर्ज करून अन्नसुरक्षा योजनेत शिधापत्रिका समाविष्ट करून धान्य उपलब्ध करून देण्याची मागणी पुरवठा विभागाकडे केली. मत्र वर्ष लोटूनही अनेक कुटुंब धान्यापासून वंचित असल्याची माहिती पुढे आली आहे तर अनेक कुटुंबांनी अनेकदा अर्ज करूनही लाभ मिळत नसल्याची माहीती काही गरीब कुटूंबांनी दिली आहे.गोरगरीब कुटूंबांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यासंदर्भात नेमका घोळ काय ? याबाबत पुरवठा माहीती घेतली असता तहसीलदारांनी अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्यापुर्वी जाहीरनामा लावावा व पुरवठा निरीक्षकांनी शिधापत्रिका धारकांच्या घरोघरी भेटी देऊन तपासणी करून अहवाल सादर करावा त्यानंतरच पात्र कुटूंबांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ द्यावा असे निर्देश दिल्यामुळे अनेक गोरगरीब कुटूंबांना हक्काच्या धान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना तालुका वगळता इतर तालुक्यात जाहीरनामा लावण्याचा व घरोघरी जाऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्याचा कुठलाही आदेश नाही मात्र कोरपना तालुका हा अतिदुर्गम व आदीवासी क्षेत्र असल्यानेच अधिकार्यांनी अटीशर्ती लावल्याचे दिसते अश्या चर्चांना कमालीचे उधाण आले आहे.
-----------------//---------------
आमची आर्थिक परिस्थिती खराब आहे, मागील दीड वर्षात अन्नसुरक्षा योजनेसाठी तीनदा अर्ज केला आहे परंतु अजूनपर्यंत आम्हाला धान्य मिळाले नाही.
(हेमंती सुरेश राम नांदा)
-----------------//-----------------
रोजमजूरी करून आमच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालतो,अनेकदा अर्ज करूनही आमच्या रेशन कार्ढावर धान्य मिळत नाही, अखेर कितीदा अर्ज करावा लागेल माहित नाही,गरीब कुटुंबांकडे लक्ष देऊन धान्य दिले पाहिजे.
(सुरेखा शेरे बिबी)
-----------------//----------------
शोकांतिका आहे,गोरगरीब कुटुंबांना वर्ष, वर्ष अन्नसुरक्षा योजनेचा लाभ दिला जात नाही,अन्नसुरक्षा योजना काय ! याचा पुरेसा अभ्यास अधिकार्यांना नाही,म्हणूनच असला प्रकार सुरु आहे,तालुक्यातील सर्व पात्र गोरगरीब कुटुंबांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करावे,अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे केली असून दक्षता समितीच्या बैठकीत तालुक्यातील पुरवठा विभागाच्या इतरही समस्या मार्गी लागतील अशी आशा आहे.
(अभय मुनोत,सदस्य ग्रामपंचायत नांदा.)
-----------------//---------------
जवळपास ५६० लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून यादी तपासणी करीता दिली आहे.पात्र व अपात्र यांची छाननी करावी लागत असल्याने वेळ लागत आहे.गोरगरीब कुटुंबांच्या शिधापत्रिका अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करू.
(महेन्द्र वाकलेकर,तहसिलदार कोरपना)
-----------------//----------------
