गडचांदूर/सैय्यद.मूम्ताज़ अली:-
कोविड लसीकरण मोहीमेला सुरूवात झाली असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी केंद्र उघडण्यात आले.या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील तालुका कोरपना येथेही लसीकरण केंद्राला सुरूवात झाली आहे.तालुक्यातील कित्येक जण याचा लाभ सुद्धा घेत असल्याचे चित्र आहे.मात्र तालुक्याच्या ठिकाणापासून २१ किमी अंतरावर असलेले शहर गडचांदूरची लोकसंख्या जवळपास ४० हजाराच्यावर आहे. नागरिकांना लसीकरणासाठी कोरपना केंद्रावर जाऊन कोरोना लस टोचून घेणे शक्य नसल्याचे लक्षात घेऊन गडचांदूर शहर भाजपतर्फे ८ मार्च रोजी चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी यांना तालुका ग्रामीण रुग्णालय मार्फत निवेदन देऊन गडचांदूर शहर येथे कोरोना लसीकरण सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. तात्काळ याविषयी सकारात्मक भूमिका घेण्यात आली व ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे १५ मार्चपासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. अंदाजे ८१ नागरिकांनी याचा लाभ घेतला असून सदरचे केंद्र सुरु केल्याबद्दल भाजपाने आभार व्यक्त केले आहे .
स्वतः व परिवाराची पर्वा न करता आजही कोरोना योद्धा म्हणून काम करणारे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.प्रवीण गोणारे,सहाय्यक अधिकारी मिलिंद नळे, डाटा अॉपरेटर गजानन राठोड,माधूरी लांडे,किरण कोळसे, श्वेता दिवे,आंचल देरगे,सुशोधन धोंगरे यांचा शहर भाजपाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार,नगरसेवक अरविंद डोहे, नगरसेवक रामसेवक मोरे,अज़ीम बेग,प्रतीक सदनपवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
