प्रामाणिक राजकारणी हरपला : ना. विजय वडेट्टीवार
.
चंद्रपूर दि.13 मार्च : काँग्रेसचे जेष्ठ नेते, पक्षविरहीत प्रामाणिक राजकारणी, आयुष्याची सुरुवातच शिक्षकी पेशातून करणारे सच्चा शिक्षक, उत्तम वकील तसेच समता, बंधुता स्वातंत्र्य या तत्वाचा पाईक असलेला आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ अनुयायी माजी आमदार ॲड. एकनाथराव साळवे आज आपल्यातून निघून गेले, ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही अशा शब्दात राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या . राष्ट्रपिता महात्म्या गांधी यांच्या विचारावर त्यांची अप्पार श्रध्दा होती. मतभेद बाजूला सारून नेहमीच सर्व पक्षातील कार्यकर्त्यावर, नेत्यावर मित्रत्वाची भावना जोपासली व त्या माध्यमातून माणसे जोडण्याची किमया साधली. त्यामुळेच ते चंद्रपूर शहरात काँग्रेसचे दोन वेळा आमदार होते. सार्वजनिक जीवनात काम करीत असताना चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासात त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
चंद्रपूर:- गांधीवादी विचारांचे पुरस्कर्ते, काॅंग्रेसचे निष्ठावंत नेते, माजी आमदार अॅड. एकनाथराव साळवे यांचे निधनामुळे चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक सांस्कृतिक व राजकीय चळवळीची फार मोठी हानी झाली आहे. ज्येष्ठतेच्या अधिकाराने त्यांनी नेहमीच मार्गदर्शकाची भुमिका पार पाडली.
चिकीत्सक व सत्यशोधकीवृत्ती असलेल्या एकनाथरावांनी सामाजिक स्तरावरील अन्यायाविरूध्द नेहमीच आवाज बुलंद केला. महात्मा फुले, डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेवून त्यांनी आपले जीवन सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी खर्ची घातले. राजकीय व सामाजिक क्षेत्रात ज्येष्ठ असलेले अॅड साळवे नेहमीच आदरार्थी राहीले. त्यांच्या सुचना मला राजकीय जीवनात नेहमीच मार्गदर्शक ठरल्या अशा सेवाभावी, समाजसेवी ज्येष्ठ नेत्यास आम्ही गमावलो आहोत अशी शोकसंवेदना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली आहे.
माजी आमदार ऍड एकनाथराव साळवे यांच्या निधनाने तळागाळातील कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ, आंबेडकरी चळवळीतील मानाच पान, राजकारण बाजूला सारून समाजकारण यशस्वीपणे रुजवणारा नेता आज आपण गमावलेला आहे. अतिशय हुशार आणि आपल्या कार्याची अमीट छाप सोडणाऱ्या कणखर नेत्याची सावली यापुढे आपल्यासोबत नसल्याचे दुःख व्यक्त करीत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी व्यक्त केल्यात.
मार्गदर्शक विचारांच्या पर्वाचा अंत - आ. किशोर जोरगेवार
समाजसेवक तथा माजी आ. अँड. एकनाथ साळवे यांनी कठीण काळात योग्य मार्गदर्शन करुन अनेकांना राजकीय व सामाजिक जिवणात मार्ग दाखविण्याचे काम केले. राजकारणातील कठीण काळात मलाही त्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या जाण्याने एक मार्गदर्शक हरपला असून मार्गदर्शक विचारांच्या पर्वाचा अंत झाला असल्याची शोकसंवेदना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.
माजी आ. अँड. एकनाथ साळवे यांनी नेहमी समाज प्रबोधनाचे काम केले. राजकारणातील समाजसेवक अशी त्यांची ओळख होती. ११ वर्ष त्यांनी चंद्रपूर विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले. त्यांच्याकडे विचारांचा मोठा ठेवा होता. चंद्रपूरच्या विकासाबाबतची त्यांची तळमळ त्यांच्या बोलण्यातून नेहमी जाणवायची. एनकाऊंटर या कादंबरीतून त्यांनी आपले विचार व उपेक्षीतांचे वास्तव दर्शवीले. आज त्यांच्या जाण्याने कधीही भरुन न निघणारे सामाजीक व राजकीय नूकसान झाले असल्याचे या शोक संदेशात आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
माजी आमदार ऍड एकनाथराव साळवे यांच्या निधनाने एक कर्तव्यनिष्ठ, अभ्यासू आणि प्रचंड लोकसंग्रह असलेला नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने चंद्रपूरची जनता त्यांना नेहमीच स्मरणात ठेवेल. चंद्रपुरातील राजकारणातील संत हरपला अशा शब्दात भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी प्रतिक्रिया दिली.
माजी आमदार ऍड.एकनाथराव साळवे साहेब यांचे दुःखद निधन झाले. मागील पाच दशकाहुन अधिक काळापासून त्यांचा सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मौलाच वाटा आहे.साधी रहाणीमान व निस्वार्थ राजकारणी म्हणून त्याची ख्याती महाराष्ट्रात होती.साळवे आणि खोब्रागडे कुटुंबाचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यांना अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष व बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.
ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला - रामू तिवारी
पुरोगामी चळवळीचे अग्रणी योद्धा, फुले, शाहू, आंहबेडकरी विचारांचे निष्ठावान प्रचारक, सत्यशोधक विचाराचे प्रखर कार्यकर्ता, लेखक, विचारवंत, काँग्रेसचे माजी आमदार अॅड. एकनाथराव साळवे यांच्या निधनाने समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांनी व्यक्त केल्या. अॅड. साळवे यांनी जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारी समाजाची हानी झाल्याचेही तिवारी यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.
तत्वनिष्ठ व्यक्तिमत्त्व हरपला - डॉ.मंगेश गुलवाडे
माजी आमदार ऍड.एकनाथराव साळवे यांच्या निधनाने तत्वनिष्ठ व्यक्तिमहत्व हरविल्याचे प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी चंद्रपुर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी दिली.माजी आमदार ऍड.एकनाथराव साळवे हे तत्वनिष्ठतेवर चालणारे उत्कृष्ठ राजकारणी, समाजसेवक व अभ्यासक होते.त्यांच्या जाण्याने राजकीय,सामाजिक तथा शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशी प्रतिक्रिया डॉ.मंगेश गुलवाडे यांनी दिली.
माजी आमदार ऍड.एकनाथराव साळवे यांच्या निधनाने तत्वनिष्ठ व्यक्तिमहत्व हरविल्याचे प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी चंद्रपुर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी दिली.माजी आमदार ऍड.एकनाथराव साळवे हे तत्वनिष्ठतेवर चालणारे उत्कृष्ठ राजकारणी, समाजसेवक व अभ्यासक होते.त्यांच्या जाण्याने राजकीय,सामाजिक तथा शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशी प्रतिक्रिया डॉ.मंगेश गुलवाडे यांनी दिली.
