चंद्रपूर - जिल्ह्यात दारूबंदीची घोषणा झाल्यावर अनेक अवैध धंद्यांना उत आले होते, अवैध दारू, चरस, गांजा असे मादक पदार्थ जिल्ह्यात छुप्या मार्गाने येत होते.
मादक पदार्थ सेवनाच्या आहारी अनेक तरुण गेले असल्याने या पदार्थावर अंकुश लावणे गरजेचे असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या सूचनेनुसार मादक पदार्थाच्या तस्करीवर अंकुश लावण्यासाठीची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांना पथक तयार करण्याचे निर्देश दिले.
8 मार्चला वरोरा नाका चौकात मादक पदार्थाची तस्करी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली, माहितीच्या आधारे संदीप कपडे यांनी सापळा रचत आरोपी अजय रविदास राहणार लालपेठ चंद्रपूर याला अटक केली.
आरोपी कडून 25 ग्राम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले असून त्याची किंमत तब्बल 1 लाख 25 हजार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी दिली.
खाडे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की जिल्ह्यात मादक पदार्थांच्या तस्करी बाबत आम्ही मुळापर्यंत जात तपास करू, जिल्ह्याला "उडता चंद्रपूर" बनू देणार नाही.
