गडचांदूर/सै.मूम्ताज अली:-
कोरपना तालुक्यातील नांदा येथे मागील ३ वर्षांपासून जलस्वराज्य टप्पा २ अंतर्गत अंदाजे १० कोटी रुपये खर्चून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. सदर कामाचे कंत्राट भंडारा येथील एका कंपनीला मिळाल्याची माहिती असून याठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याची बोंब सुरू आहे.येथील नांदाफाटा चौकातील पाण्याची पाईपलाईन एकाच ठिकाणी तीनदा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता मुख्य मार्गालगत वारंवार खोदकाम होत असल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजत आहे.तसेच धुळीमुळे स्थानिक नागरिकांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. #News34Chandrapur
सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले मात्र जलस्वराज्य अभियंता कंत्राटदाराला पाठीशी घालत या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप होत आहे.मागील वर्षभरापासून जलस्वराज्यच्या विविध समित्यांची कुठलीही बैठक घेण्यात आली नसल्याची माहिती असून नांदा येथील अनेक सिमेंट काँक्रिटचे रस्ते कंत्राटदाराने पाईपलाईनसाठी फोडले,काही रस्त्याची दुरुस्ती अद्यापही करून दिलेली नाही तर काही ठिकाणी दुरूस्तीसुद्धा निकृष्ट दर्जाची केलेली आहे. तसेच अनेक ठिकाणी पाईपलाईन चक्क उघड्यावर पडलेली दिसत आहे.याकडे नांदा ग्रामपंचायत पदाधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे व कामाबद्दल कसलेच नियोजन नसल्याचे आरोपांना उधाण आले असून सिमेंट काँक्रिटचा नवीन रस्ता बनवण्यापूर्वी कंत्राटदाराला पाईपलाईन टाकायला लावणे गरजेचे होते मात्र असे न करता आधी रस्ता तयार केला जातो आणि नव्याने सिमेंट काँक्रिट रस्ता बनवल्यावर ते पाईपलाईनसाठी तोडला जातो,असा अजब प्रकार याठिकाणी सुरू असून अजूनही काही भागात पाणी पुरवठा होत नसल्याची व काही भागात पाईपलाईनच टाकली नसल्याची बाब समोर आली आहे.
सदर ग्रा.पं.पदाधिकारी अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने भविष्यात याचा फटका नागरिकांना बसणार आणि पाणीपूरवठा याेजनेचे हस्तांतरण ग्रा.पं.ला झाल्यावर मोठी अडचण निर्माण होणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.अशाप्रकारे वारंवार पाईपलाईन फुटत असल्याने ग्रा.पं.सदस्य अभय मुनोत यांनी दुरूस्तीचे काम बंद पाडत जलस्वराज्य अभियंता व ठेकेदाराला बोलावण्याची मागणी केली.परंतु ग्रा.पं.च्या काही पदाधिकार्यांनी पोलीसांना बोलावले आणि त्यांच्या मध्यस्थी व उपस्थितीत दुरुस्तीचे काम सुरू झाल्याची माहिती आहे.असे असले तरी जलस्वराज्य अभीयंते कामाची पाहणी जाग्यावर बसवून करीत असल्याने याठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे आरोप होत आहे.संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देण्याची गरज असून गडचांदूर वणी राज्यमार्गा लगतच खोदकाम होत असताना सा.बां.विभागाने सुद्धा याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
