ताजी बातमी - राज्यात भाजपने वीज दरवाढीच्याविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या या आंदोलनाची खिल्ली उडवतानाच त्यावर संतापही व्यक्त केला आहे. गॅस आणि इंधन दरवाढ करून वीज माफीसाठी आंदोलन करणं म्हणजे भाजपची दुटप्पी भूमिका आहे, असं सांगत वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करतच भाजपला फटकारले आहे.
बहनो और भाईओ, क्या डिझेल के दाम बढ रहे है वो आपको पसंद है? असं मोदी निवडणुकीपूर्वी म्हणत होते ना? आज डिझेलचे भाव काय आहेत? हे भाजपने सांगावं, असा सवाल करताना वडेट्टीवार यांनी थेट मोदींचीच नक्कल करण्याचा प्रयत्न केला. एकीकडे वीज दरवाढीत सवलत दिली जात नाही म्हणून भाजप आंदोलन करतंय. दुसरीकडे आजच भाजपने गॅस सिलिंडरचे दर 25 रुपयाने वाढवले आहेत. त्यामुळे भाजपने आंदोलन करताना किमान जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी, अशी टीकाही त्यांनी केली.
शिवसेनेने इंधर दरवाढीविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाचं विजय वडेट्टीवार यांनी समर्थन केलं. ज्यावेळी डिझेलचे भाव 54 रुपये होते. त्यावेळी आंदोलने झाली. आता हे दर 85 रुपये झाले असताना आंदोलने का करू नयेत? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. त्यावेळच्या तुलनेत आता कच्चा तेलाचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे भावही कमी व्हायला हवेत. कच्चा तेलाचे भाव कमी असताना केंद्र सरकारने इंधन दरवाढीविरोधात कर रुपाच्या माध्यमातून 20 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. हा भाजपचा दुटप्पीपणाच नाही का? असा सवालही त्यांनी केला.