ताजी बातमी - पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. चर्चगेटमधील छेडा सदन निवासस्थानाहून दुपारी अडीचच्या सुमारास संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यानंतर वर्षा बंगल्यावरील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.
दुपारी अडीचच्या सुमारास संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या चौकशीनंतरच राजीनामा स्वीकारण्याची विनंती राठोड यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र दालनात चर्चा झाली. संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यास एकनाथ शिंदे यांनी विरोध केला. राठोड यांनी पोहरादेवीच्या महंतांशी बोलण्याची विनंती केली, परंतु मुख्यमंत्र्यांनी चर्चेला नकार दिला. मला माझा निर्णय घ्यावा लागेल, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती.
संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची चौकशी बसवली जाण्याची चिन्हं आहेत. यानुसार संजय राठोड यांचीही चौकशी केली जाईल. राठोड दोषी आढळल्यास त्यांच्यावर त्यांच्यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
संजय राठोड यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यास त्यांना पुन्हा तिकीट देण्यास शिवसेनेकडूनच विरोध होऊ शकतो. पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेची प्रतिमा मोठ्या प्रमाणावर मलीन झाली आहे. त्यामुळे शिवसेनेची प्रतिमा आणखी मलीन होऊ नये म्हणून राठोड यांना तिकीट देण्यास शिवसेनेतून विरोध होऊ शकतो.