चंद्रपूर - संजय राठोड यांचा राजीनामा ही मीडिया ट्रायलची परिणती आहे, असे वक्तव्य राज्याचे मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. भाजप नेत्यांची महिलांबाबतीच डझनभर प्रकरणे मला सांगता येतील. पण भाजप नेत्यांसाठी नैतिकता लागू पडत नाही, तिथे नैतिकता संपुष्टात येते, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
शिवसेनेचा कोणताही नेता संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना दिसत नाही. तसेच याबाबतीत अंतिम निर्णय हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील, असे शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे.
संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरुन शिवसेनेत दोन गट पडल्याची चर्चा आहे. राठोड यांनी राजीनामा देऊ नये, असे सेनेतील एका गटाचे म्हणणे आहे. यापैकी एक गट नैतिकता जपण्यासाठी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशा मताचा आहे. तर दुसरा गट संजय राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई होऊ नये, असे म्हणत आहे.
