चंद्रपूर - कोरोनाचे संकट पुन्हा एकदा जीवावर उठले असताना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयच आजारी असल्याचे भीषण वास्तव पुढे आले आहे. स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे.
सर्वसामान्य नागरिकांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजे एकप्रकारे पुनर्जन्माचे ठिकाण. गोरगरिबांना याच रुग्णालयाचा मोठा आधार असतो. पण हेच रुग्णालय रुग्णांच्या जीवाशी खेळ करीत असेल तर गरिबांना जगायचे कसे, असा प्रश्न पडतो. हा प्रश्न यासाठी पडलाय की, चंद्रपूरचे जिल्हा रुग्णालय त्या स्थितीत आहे. या जिल्हा रुग्णालयाचे संचालन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत आहे. पण या संस्थेच्या प्रमुखाला रुग्णालयाच्या सोयीसुविधांशी काही देणेघेणेच उरलेले नाही, असे चित्र बघायला मिळत आहे. जिल्हा रुग्णालयात सदर प्रतिनिधीने जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली, तेव्हा धक्कादायक चित्र नजरेस पडले. महत्वाच्या कक्षांसामोर कुत्री-डूकारांची हजेरी होती. वैद्यकीय कचऱ्याच्या पिशव्यांचा खच याच परिसरात पडून होता. शौचालये घाणीने माखलेली, दारे तुटलेली, ऑक्सिजन कक्षात गाढवाची उपस्थिती, जागोजागी कचऱ्याचे ढीग, प्रत्येक ठिकाणी पानाच्या पिचकाऱ्या, दुर्गंधी, इमारतीला लागूनच भंगार असे विदारक चित्र इथे दिसून आले. हे चित्र तर रुग्णालयाच्या बाहेरचे आहे. आतमध्ये यापेक्षा वेगळे नाही. रुग्णालयात जाण्याची परवानगी नसल्याने आतमध्ये नेमकी काय स्थिती आहे, याचे चित्र समोर येऊ दिले जात नाही. गेल्या महिनाभरापासून येथील स्वच्छता कर्मचारी आंदोलन करीत आहेत. पाच महिन्यांचे त्यांचे वेतन थकल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. ज्यांच्या खांद्यावर रुग्णालयाच्या स्वच्छतेचा भार आहे, त्याच स्वच्छतादूतांना पाच-पाच महिने वेतन नाही. त्यांच्या समस्येवर तोडगा काढायला डीनकडे वेळ नाही.
आता कोरोनाने नव्याने तोंड वर काढले आहे. रुग्ण वाढत चालले. अशा गंभीर स्थितीत रुग्णालयाची ही केविलवाणी स्थिती असेल, तर कोरोनाशी कसे लढायचे, असा प्रश्न पडतो. रुग्णालयाची स्थिती एवढी गंभीर असूनही शासकीच वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अरुण हुमने हे बोलायला तयार नाहीत. फोन केला की ते बाहेरच असतात. त्यामुळं हे रुग्णालय सध्या रामभरोसे असल्याचे दिसून येते. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयांची स्थिती सध्या बऱ्यापैकी असली, तरी रिक्त पदांची समस्या मोठी आहे. त्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार येत आहे. जिल्ह्यात 9 ग्रामीण रुग्णालये, चार उपजिल्हारुग्णालये आहेत. त्यात वर्ग एकची अकरा पदे, वर्ग दोनची 20 टक्के पदे, वर्ग तीन आणि चारची 25 पदे रिक्त आहेत. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी पाठपुरावा केलाय, पण त्याला शासनाकडून पाहिजे तो प्रतिसाद मिळत नसल्याने आहे त्या मनुष्यबळात कामकाज करावे लागत आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची दमदार नेता म्हणून ओळख आहे मात्र चंद्रपूर जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून सुद्धा आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अवस्था दयनीय झाली आहे.
मागील 20 दिवसांपासून शासकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांचे 7 महिन्याच्या थकीत वेतनासाठी डेरा आंदोलन सुरू आहे, पालकमंत्री वडेट्टीवार यांनी बैठक तर लावली मात्र जोपर्यंत थकीत वेतन व किमान वेतन कायद्यानुसार पगार मिळणार नाही तो पर्यंत आंदोलन असे सुरू राहणार अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे.