चंद्रपूर - कोरोना काळ व भाजप पक्षाच्या प्रेमापोटी तब्बल 4 वर्षे राहुल पावडे यांनी मनपातील स्थायी समिती सभापती पद भूषविले मात्र फेब्रुवारी महिन्यात सभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत भाजपकडून रवि आसवानी व वसंता देशमुख यांची नावे चर्चेत होती, वसंता देशमुख हे सभागृह नेता होते मात्र पक्ष श्रेष्ठीनी त्यांना पदाचा राजीनामा द्यायला सांगितले.
देशमुख आता सभापती बनणार असे स्पष्ट झाले मात्र ऐनवेळी त्यांना डावलून रवि आसवानी यांना संधी देण्यात आली, यावर नगरसेवक वसंता देशमुख जाम नाराज झाले, त्याचबरोबर त्यांच्या समर्थकात सुद्धा रोष निर्माण झाला.
या सर्व नाट्यक्रमात वसंता देशमुख यांच्या समर्थकांनी मी एक वास्तववादी मंचाने संघटनेचे भोला मडावी यांनी पक्ष श्रेष्ठीवर आरोप केला की मागील 30 वर्षे देशमुख हे पक्षाशी प्रामाणिक व एकनिष्ठ राहिले, मात्र त्यांना त्यांच्या प्रामाणीकतेचं फळ मिळाले नाही, मात्र 7 मतांनी निवडणून आलेल्या आसवानी यांना ऐनवेळी सभापती पद देऊन देशमुख यांचा अपमान भाजपने केला असून येणाऱ्या निवडणुकीत आम्ही देशमुख यांच्या सोबत असू ते जे निर्णय घेतील आम्ही त्यांच्या सोबत राहू.
भोला मडावी यांच्या आरोपावर भाजपने स्पष्टीकरण दिले की भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक श्री. वसंता देशमुख यांच्यावर स्थायी समिती सभापती पदासंदर्भात अन्याय झाल्याच्या वल्गना श्री. भोला मडावी यांनी पत्रकार परिषद घेवून केल्या, मडावी यांचे आरोप पूर्णपणे निराधार असून वसंत देशमुख यांच्यावर भारतीय जनता पार्टीने कोणताही अन्याय केलेला नाही, असा खुलासा भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे तसेच महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केला आहे.
गेली २५ वर्षे भारतीय जनता पार्टीने वसंत देशमुख यांना निवडणूकीत तिकीट दिले आहे व पक्षसंघटनेच्या बळावर ते निवडणूकही आले आहे. गटनेता आणि सभागृहनेता अशी दोन पदे त्यांच्याकडे असल्यामुळे एका पदाचा राजीनामा त्यांच्याकडून घेण्यात आला. शिवाय यापूर्वी त्यांना उपमहापौर पद सुध्दा देण्यात आलेले आहे. नगर परिषदेच्या कार्यकाळात सुध्दा उपाध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. पक्षाने वेळोवेळी त्यांचा सन्मान केलेला आहे, त्यांना पदे बहाल केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही अन्याय झालेला नाही. त्याचप्रमाणे या निवडणूकीत राहूल घोटेकर, चंद्रकला सोयाम, पुष्पा उराडे, अंकुश सावसाकडे हे अनुसूचित जाती तसेच जमातीचे मनपा सदस्य पदाधिकारी झाले आहेत. त्यामुळे बहुजन समाजावर अन्याय झाला असे म्हणणे सुध्दा चुकीचे आहे. भारतीय जनता पार्टीने नेहमीच सर्व समाजाचा सन्मान केलेला आहे. त्यामुळे अशा पध्दतीचे आरोप हे पूर्णतः चुकीचे आहे. भोला मडावी यांनी केलेले आरोप पुर्णतः निराधार असून ही बाब पूर्णतः पक्षाअंतर्गत आहे. पक्षाअंतर्गत व्यवस्थेअंतर्गतच निर्णय घेतले जातात. भोला मडावी यांना स्पष्टीकरण देणे, उत्तरे देणे यासाठी आम्ही बांधील नाही, असेही भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे तसेच महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी म्हटले आहे.
