ताजी बातमी - कोरोना लॉकडाऊन काळात अव्वाच्या सव्वा बिले काढून सामान्यांना वेठीस धरले आहे. राज्यभरात आता वसुली सुरु केली असून वीज जाण्याच्या भीतीने लोक हळूहळू का होईना हप्त्यांमध्ये ही बिले भरू लागले आहेत. अशातच मुंबईच्या नालासोपाऱ्यातून एक खळबळजनक बातमी आली आहे. News34
नालासोपाऱ्याच्या निर्मल गावात राईस मिल चालविणाऱ्या एका 80 वर्षांच्या वृद्धाला सोमवारी विज वितरण कंपनीने १० पंधरा हजार नव्हे तर चक्क 80 कोटींचे बिल पाठवून दिले आहे.
हा आकडा पाहताच हे मिल मालक गणपत नाईक यांचे डोळेच पांढरे झाले. उच्च रक्तदाब असल्याने त्यांना थरमरी भरली. यामुळे त्यांना हॉस्पिटलाईज करावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
यावर महावितरणला विचारले असता त्यांनी ही तांत्रिक चूक असल्याचा खुलासा केला आहे. तसेच गणपत नाईंकांचे वीज बिल हे 80 कोटी नाही तर 6,400 रुपये असल्याची सारवासारव केली आहे. गणपत नाईक हे बिल भरतीलही, परंतू त्यांना जो मानसिक त्रास, ताण सहन करावा लागला, त्यांचे जे नुकसान झाले ते कोण भरून देणार असा प्रश्न पडला आहे.
