भद्रावती/अब्बास अजानी
भद्रावती तहसिल कार्यालयाच्या आवारात असलेल्या अधिकृत Stamp Papers विक्रेते हे १०० रुपये किमतीचा स्टॅम्प पेपर्स ग्राहकांना चक्क १५० रुपयात विकत असून या प्रकारामुळे खेड्यापाड्यावरून तहसिल कार्यालयात येणाऱ्या गोरगरिबांची लूट होत असून याची सविस्तर चौकशी करून अशी आर्थिक लूट करणाऱ्या स्टॅम्प पेपर्स विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी भद्रावती नगर परिषदेचे सभापती विनोद वानखेडे यांनी तहसीलदारांना दिलेल्या एका निवेदनातून केली आहे.
अनेक गरजू लोकांना १०० रुपये किमतीच्या स्टॅम्प पेपर्सचे विविध कार्यासाठी काम पडते मात्र भद्रावती तहसिल कार्यालयातील स्टॅम्प पेपर्स विक्रेते हे १०० रुपयांचा स्टँम्प १५० रुपयाला विकतात एखादा ग्राहकाने त्यांच्याशी वाद घातल्यास त्याला स्टॅम्प पेपर्स नाही म्हणून सांगतात.त्यामुळे त्यांचे काम अडते परिणामी त्याला नाईलाजाने १५० रुपये मोजावे लागतात. यात खेड्यापाड्यावरून येणाऱ्या ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना आर्थिक फटका बसतो त्यामुळे या स्टॅम्प पेपर्स विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी सभापती विनोद वानखेडे यांनी तहसीलदारांना एका निवेदनातून केली आहे.
