News34 chandrapur
चंद्रपूर - प्रबोधनकार ठाकरे यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. मग भलेही बालविवाह व विधवांच्या केशवपनाची अभद्र रूढी असो, देवळांमधील ब्राम्हण पुजाऱ्यांची
अरेरावी, हुकमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्न असो किंवा हुंडाप्रथेचा प्रश्न असो, ते या सर्व
आघाड्यावर अखेरपर्यंत त्वेषाने लढत राहीले त्यांच्या लढयापासून तत्वांपासून त्यांना परावृत्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, अनेक आमिष दाखविली.
पण प्रबोधनकारांनी कशालाही दाद
पण प्रबोधनकारांनी कशालाही दाद
दिली नाही. अन्याय रूढी, जाती-व्यवस्था आणि अस्पृशता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन व
प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून त्यांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला. सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते असे प्रतिपादन मा. गंगाधर बनबरे, प्रसिद्ध व्याख्याते पुणे यांनी शिवमहोत्सव समिती चंद्रपुर द्वारा आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेचा तिसरा दिवस
"प्रबोधनाचा ज्वालामुखी प्रबोधनकार ठाकरे" या विषयावर दिनांक १३ नोव्हेंबर ला स्थानिक
इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे केले.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. इंजि चंद्रकांत जाधव, माजी जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ चंद्रपूर, प्रमुख वक्ते मा. गंगाधर बनबरे, प्रसिद्ध व्याख्याते पुणे, प्रमुख पाहुणे संदीप गिऱ्हे, जिल्हाप्रमुख शिवसेना, मा. चंद्रशेखर झाडे, जिल्हासचिव, संभाजी ब्रिगेड, चंद्रपूर, डॉ. दिलीप कांबळे, प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट, चंद्रपूर, मा. धर्मेंद्र पाटील, संचालक, आयशर ट्रॅक्टर, चंद्रपूर, मा. गणेश तिघरे, C.A., चंद्रपूर, मा. वनिताताई आसुटकर, जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, चंद्रपूर, मा. गौरव सोनटक्के, गौरव पेट्रोलियम, ताडाळी, मा. डॉ. रूचिता तेजराव पाटील, सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ, बुलढाणा आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बनबरे सर म्हणाले की, त्यांच्या कार्यख्यातीमुळे ते राजर्षी शाहू महाराजांच्या संपर्कात आले. शाहू महाराज हे स्वतः सुधारणावादी व महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे ते प्रबोधनकारांचे चाहते झाले. त्यांनी प्रबोधनकारांची परीक्षाही घेतली व नंतर जाहीरपणे सांगितले की, लाच देऊन ज्याला वश करता येणार नाही किंवा विकत घेता येणार नाही अशी एकच व्यक्ती मी पाहिली आहे, ती म्हणजे प्रबोधनकार होय. यासोबतचे प्रबोधनकारांचे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी खुप मोठी सामाजिक बांधीलकी होती. बरीच सामाजिक कार्य ही दोघे मिळून करायचे, एकमेकांना सहकार्य करायचे असे ते म्हणाले.
आजच्या दिवसीचे पुष्प हे दिवंगत प्रा. तेजराव पाटील यांच्या नावाने पाटील परिवार गोंडपिपरी तर्फे करण्यात आले. यावेळी दिवंगत प्रा. तेजराव पाटील यांच्याबाबत माहिती मा. तरन्नुम मलक शाकीर यांनी दिली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवमहोत्सव समितीचे निमंत्रक मा. विनोद थेरे यानी केले. याप्रसंगी ते म्हणाले की, पुढे पुढे व्याख्यानमालेची व्याप्ती वाढविण्याचा मानस आहे. आम्ही आता कार्यक्रमाच्या दिवसी ज्या लोकांना आपली एकसष्टी साजरी करायची आहे किंवा कोणाला इतर काही प्रेरणापुष्प द्यायचे आहे. त्यांचे त्या दिवसीचे पुष्प ठेवून घेण्यात येईल तसेच ज्यांना कोणाला शिवमहोत्सव समिती मध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी बिनधास्त आमच्याशी संपर्क करून सहभागी होऊ शकता असे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषण करताना मा. इंजि चंद्रकांत जाधव यांनी म्हटले की, प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याचा उजाळा देणे अत्यंत गरजेचे आहे. कारण त्यांची साहीत्य ही खुप मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहचली नाही. सामाजिक कार्यात यांचा असलेला वाटा कसा होता हे लोकापर्यंत पोहचविण्याच काम शिवमहोत्सव समिती चंद्रपूरतर्फे व्याख्यानमालेच्या माध्यमातून करण्यात येत आहे ही खुप मोठी बाब आहे असे ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांना स्मृतिशेष दादाजी पाटील गणपतराव आसुटकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मा. रविभाऊ आसुटकर यांच्याकडून सन्मानचिन्ह देण्यात आले. आजच्या कार्यक्रमाचे संचालन मा. संतोष भोयर यांनी केले. तर आभार प्रदर्शन मा. सुरेंद्र इंगळे, तालुकाध्यक्ष, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, चंद्रपूर यांनी मानले. कार्यक्रमाला चंद्रपूर तसेच जवळपासच्या परिसरातील हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवमहोत्सव समिती चंद्रपूरच्या सदस्यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले.