मूल (गुरू गुरनुले)
पक्ष नेतृत्वाच्या नियोजित मेळाव्याच्या ऐन तोंडावर स्थानिक पदाधिका-याच्या एकाधीकारशाहीला कंटाळून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीला रामराम ठोकणार असल्याची चर्चा आहे.
बल्लारपुर विधानसभा क्षेञात समाविष्ठ असलेला मूल तालुका राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणुन ओळखला जातो. राजकीय दृष्ट्या भाजपा आणि काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या या तालुक्यात अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातुन जनते समोर येण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही महीण्यांवर येवुन ठेपलेल्या मूल नगर परीषदेच्या निवडणुकी नंतर जिल्हा परीषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजय मिळविता यावा म्हणुन विविध राजकीय पक्षाची मंडळी प्रयत्नरत आहेत. Nationlalist congress party
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन आपआपल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे कार्यक्रम आयोजित करून पक्षातंर्गत मरगळ झटकण्याचे काम केल्या जात आहे. असे करीत असताना काही पक्षाची मंडळी स्वतःला ज्येष्ठ नेते समजुन पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांना माञ सापत्न वागणुक देत असल्याने कार्यकर्त्यामधुन नाराजीचा सुर ऐकायला मिळत आहे. सध्या मूल तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एका नेत्याच्या एकाधिकारशाही वृत्तीची जोरदार चर्चा आहे. जिल्हास्तरावरील ज्येष्ठ नेत्याच्या सहकार्याने आदिवासी समाजाच्या एका कार्यकर्त्याची उचलबांगडी करून पक्षाचे विधानसभा अध्यक्ष पद मिळविलेल्या या नेत्याचे पक्षाच्या नांवाने निर्माण केलेले व्यैयक्तीक संपर्क कार्यालय प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या भाजपा आणि काँग्रेसला लाजवणारे आहे. जिल्ह्यातील काही ज्येष्ठ् नेत्यांचा वरदह्स्त या स्थानिक नेत्याला असल्याने मूल वरून जाणारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कोणताही नेता असो की मंञी या नेत्याच्या कार्यालयाला भेट देवुनच पुढील मार्गक्रमण करीत असतो. त्यामुळे माझ्या शिवाय तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभी राहुच शकत नाही. अशी धारणा मनी बाळगलेल्या या नेत्याचा सध्या पक्षाच्या स्थानिक स्तरावर स्वैराचार सुरू आहे. पक्षाच्या तालुकाध्यक्षा शिवाय इतर पदाधिका-यांना विश्वासात आणि विचारात न घेता मर्जीतल्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून सदर नेत्याचा पक्षातंर्गत मनमानी कारभार सुरू आहे. कार्यक्रमाचे आयोजन असो की नेत्यांचे दौरे असो. प्रत्येक कार्यक्रमात तालुकाध्यक्षा शिवाय महत्वाच्या पदाधिका-यांना हेतुपुरस्सर डावलणे, त्यांना वरीष्ठ नेत्यांशी बोलणे तर दुरच संपर्कातही येवु न देणे आदी प्रकार या नेत्याकडून होत असल्याने पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत. नुकत्याच झालेल्या संपर्क मंञी प्राजक्त तनपुरे यांच्या मूल भेटीत पक्षाच्या तालुकाध्यक्षाना साधी सुचनाही दिली नाही. पक्ष कार्यालयाच्या नांवाने थाटलेल्या सदर नेत्याच्या वैयक्तिक संपर्क कार्यालयात समस्यांचे निवेदन घेवुन गेलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्षाना राज्यमंञी तनपुरे यांना भेटु न देणे आणि तनपुरे यांच्या स्वागतासाठी पंचारती घेवुन महीलांसह उभ्या असलेल्या पक्षाच्या महीला अध्यक्षांना पंचारती ओवाळण्यास विरोध करणे आदी प्रकार घडल्याने पक्षाच्या तालुकाध्यक्षासह अनेक पदाधिकारी सदर नेत्याच्या मनमानी कारभारावर नाराज आहेत. १८ नोव्हेंबर रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार sharad pawar यांच्या उपस्थितीत मूल येथे मेळावा आयोजित आहे. याही आयोजनातुन स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्या जात नसल्याने तालुकाध्यक्षा शिवाय पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याचे बोलल्या जात आहे. राष्ट्रीय नेत्याच्या भेटीच्या ऐन तोंडावर स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्थानिक नेत्याच्या एकाधिकारशाहीचा विरोध करीत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याने पक्षाच्या स्थानिक वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे.
