प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - चंद्रपूर जिल्ह्यातील मुल हे मुख्य शहर असून सुरुवाती पासूनच तहसील असलेल्या मुल येथे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले आहे.मुल तालुक्याची लोकसंख्या १,१४,६११ आहे तर याला जोडूनच सावली, सिंदेवाही, पोंभुरणा, याची एकूण लोकसंख्या ४,६४,५३६ आहे. एकंदरीत मुलच्या उपजिल्हा रुग्णालयात चारही तालुक्यात मिळून एकूण ५,७९,१४७ रुग्ण येत असतात ही वस्तुस्थिती आहे. चंद्रपूर जिल्ह्यात फक्त वरोरा व मुल येथे उपजिल्हा रुग्णालय आहे व वरोरा उपजिल्हा रुग्णालयात १०० खाटाचे श्रेणीवर्धन केले आहे. तसेच जिल्ह्यातील मुल पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तालुक्यातील ब्रम्हपुरी, चिमूर,व राजुरा या ठिकाणाचे ग्रामीण रुग्णालय सुदधा १०० खाटाचे केले आहे. परंतु मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात इमारत व सर्व सुविधा असतांना सुद्धा अजूनपर्यंत १०० खाटाचे श्रेणीवर्धन केलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये फार असंतोष पसरला आहे. करिता विशेष बाब म्हणून मुलचे उपजिल्हा रुग्णालय १०० खाटाचे श्रेणीवर्धन करण्यात यावे अशी मागणी आरोग्यमंत्री नाम.राजेश टोपे व मदत पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांचेकडे माजी आमदार देवराव भांडेकर यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मुलचे उपजिल्हा रुग्णालय १०० खाटाचे श्रेणीवर्धन करण्यासठी ३१ जानेवारी २०२१ रोजी विशेष बाब म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षकांनी जिल्हा शल्य चिकित्सक चंद्रपूर यांचे मार्फत सदर प्रस्ताव मान.उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर यांनी दिनांक १९ ,मार्च २०२१ ला शासनाकडे सादर केला होता परंतु सदर प्रस्तावावर शासनाने पुढील कार्यवाही करुन मुल उपजिल्हा रुग्णालय १०० खाटाचे करण्याचे आदेश अजूनपर्यंत निर्गमित केलेले नाही. त्यामुळे सदर प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. तरी मुल येथील उपजिल्हा रुग्णालयाचे विशेष बाब म्हणून १०० खाटाचे श्रेणीवर्धन करण्याचे आदेश देण्यात यावे अशी विनंती सुद्धा माजी आमदार देवराव भांडेकर यांनी केली आहे.
