चंद्रपुर - चंद्रपुर महानगरपालिकेतील आमसभेत गुरुवार(२९ जुलै) ला मनसे व काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी नगर सचिवाला मारहाण केली. हेच नाहीतर सभागृहात बॉटल फोडून धिंगाणा घातला. ही घटना लोकशाहीला काळिमा फासणारी आहे.त्यामुळे या घटनेत सहभागी काँग्रेस व मनसे च्या नगरसेवकांना बडतर्फ करण्यात यावे,अशी मागणी प्रसिद्धी पत्रकातून भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे , संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रविंद्र गुरनुले, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे यांनी केली आहे.
गुरुवार ला नेहमी प्रमाणे,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आभासी आमसभेचे आयोजन करण्यात आले होते.परंतु मनसे व काँग्रेसच्या नगरसेवकांनी कोरोना नियमांना पायदळी तुडवत बॅनरसह घोषणाबाजी करीत सभागृहात प्रवेश केला.हे दृश्य बघून मनपा प्रशासन अवाक झाले.दरम्यान त्या नगरसेवकांनी राडा करून नगर सचिवाला मारहाण पण केली.अनेकांनी समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते जुमानले नाही.
आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी या नगरसेवकांनी हिंसेचा मार्ग पत्करला.ही बाब निश्चितच लोकशाहीला काळिमा फासणारी आहे.या घटनेचा भाजपा महानगराने तीव्र निषेध केला असून त्या सर्व नगरसेवकांना बडतर्फ करण्यात यावे अन्यथा भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर आंदोलनाचा मार्ग स्विकारेल. असाच प्रकार सुरू राहिला तर, भाजपा याला सडेतोड उत्तर देण्यास सक्षम आहे.अशी चेतावणी प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.



