प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल: नागरीकांना आधार कार्ड काढण्यासाठी मूल शहरात अनेक ठिकाणी आधार केंद्राला मान्यता दिली, मात्र मूल येथील 1-2 आधार केंद्र सोडले तर सर्व बंदस्थितीत आढळुन येत आहे. यामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, बंद असलेले आधार केंद्र सुरू करून नागरीकांना होणार त्रास दुर करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.
कोणत्याही अति महत्वाच्या कामासाठी आधार कार्ड असणे खुप गरजेचे झालेले आहे, आधार कार्ड शिवाय सध्या कोणतेही काम पुर्ण होत नाही, आधार कार्ड आजच्या घडीला सर्वात महत्वाचे ओळखपत्र बनले आहे. बॅंकेत खाते उघडण्यासाठी, रेशन दुकानावर धान्य घेण्यासाठी, पॅनकार्ड साठी तथा इतर आवश्यक सेवेसाठी आधार कार्ड असणे आवश्यक झाले आहे. तसेच ते अपडेट असणे सुदधा महत्वाचे ठरले आहे. परंतु मूल मध्ये नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेले आधार केंद्रच निराधारासारखे झाले आहे. येथील तहसिल कार्यालयात दोन आधार केंद्र आहेत. त्यापैकी एका आधार केंद्रातील सेवा अनेक दिवसापासुन बंद अवस्थेत आहे. संबधितांनी पर्यायी व्यवस्था न ठेवल्याने तहसिल कार्यालयातील एका केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी बघायला मिळते. आधारच्या तपसिलासाठी बराच वेळ लागत असल्याने येथे आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागत आहे. येथील एका खाजगी बॅंकेत असलेली आधार केंद्राची हीच अवस्था असल्याचे सांगण्यात येते. आधार सेवाच निराधारासारखी वावरत असल्याने नागरिकांनी आधार कार्डसाठी जावे कुठे असा प्रश्न विचारल्या जात आहे. तहसिल कार्यालयात पुन्हा एक नवीन आधार केंद्र सुरू करावे अशी मागणी होत आहे.
मूल शहराची लोकसंख्या पंचवीस हजाराच्या वर असून तालुक्याची लोकसंख्या एक लाखाच्या वर आहे. त्यामुळे तहसिल कार्यालयात नवीन आधार केंद्राची मागणी येथे होत आहे. ग्रामीण भागात मोजक्याच ठिकाणी आधार केंद्र आहेत. विदयार्थी आणि नागरिकांच्या सेवेसाठी शहर आणि ग्रामीण भागात आधार केंद्रांची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
