चंद्रपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपेक्षित समाजाला एकत्र आणले, त्यांचा उद्धार केला मात्र आजही देशातील अनेक राज्यात लहान जातींना तो सन्मान मिळाला नाही.
साक्षरतेच्या युगात जातपंचायतीचे निर्णय निरक्षरतेचे उदाहरण म्हणून समोर येत असतात.
चंद्रपूर शहरात सुद्धा असेच एक उदाहरण समोर आले आहे.
जातपंचायतीच्या जाचामुळे वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्यास कुणी तयार नव्हते, जर कुणी पार्थिवाला खांदा दिला तर त्याला जातीच्या बाहेर काढल्या जाणार असा फतवाच जात पंचायतीने काढला अश्यातच मृतक प्रकाश ओगले यांच्या कुटुंबातील मुलीने स्वतः वडिलांच्या पार्थिवाला खांदा देत जातपंचायतीच्या तुघलकी निर्णयापुढे उभे राहिल्या.
चंद्रपूर शहरातील भंगाराम वॉर्ड येथील ही घटना आहे. काल या परिसरात राहणाऱ्या प्रकाश ओगले यांचं दीर्घ आजारानं निधन झालं, प्रकाश ओगले यांच्या मृत्यूचा निरोप नातलगांना देण्यात आला मात्र काही तासातच गेल्या १५ वर्षांपासून प्रकाश ओगले भोगत असलेला जात पंचायतीचा बहिष्कार पुन्हा एकदा आड आला.
गोंधळी समाजाच्या प्रकाश ओगले यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची... पदरी ७ मुली आणि २ मुलं .. त्यामुळे त्यांना समाजातील समारंभ, लग्न, कार्यक्रम यांना जाणं शक्य होत नव्हतं, त्यामुळे समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला, आर्थिक दंड लावला मात्र प्रकाश ओगले यांनी दंड भरला नाही आणि हा बहिष्कार त्यांच्या मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतर ही कायम राहिला. मात्र MPSC ची तयारी करणाऱ्या त्यांच्या जयश्री या मुलीने जात पंचायतीला सणसणीत चपराक लागावत आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याचा निर्णय घेतला. गोंधळी समाजाच्या जात पंचायतीच्या या जाचाविरूद्ध काही सामाजिक कार्यकर्ते लढा देत आहेत. त्यांच्या मते समाजातील गरिबांकडून पैसे लुबाडने, बहिष्कार टाकणे आणि त्यामाध्यमातून संपूर्ण समाजावर आपली दहशत बसविण्याचं काम जात पंचायत करते. सध्या विदर्भात ३५ कुटुंबं अशा प्रकारचा जात पंचायतीचा बहिष्कार भोगत असल्याची बाब या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे आणली आहे.
