चंद्रपूर - वर्ष 2015 ला चंद्रपूर जिल्हा भाजप सरकारने दारूबंदी म्हणून घोषित केला, मात्र भाजपची सरकार पाय उतार झाल्यावर राज्यात महाविकास आघाडीची सरकार आली, ज्यामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठविली.
जिल्ह्याच्या दारुबंदीवर समीक्षा करण्यासाठी सेवानिवृत्त प्रधान सचिव रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नेमणूक करण्यात आली होती.
जिल्ह्यातील दारूबंदी पूर्वी व नंतरची परिस्थिती, शासनाचे अहवाल, नागरिकांचे निवेदने यांच्यावर सखोल अभ्यास करीत जिल्ह्याची दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
आज 8 जून रोजी महाराष्ट्र गृह विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत दारू दुकान परवाना विषयी सूचना निर्गमित केल्या आहे.
जुन्या आबकारी अनुज्ञप्ती रीतसर करणे, व शासनाच्या धोरणानुसार नवीन आबकारी अनुज्ञप्ती देण्याबाबत निर्देश देणे, चंद्रपूर जिल्ह्यातून स्थलांतरित न झालेले जे तत्कालीन अनुज्ञप्तीधारक विनंती करतील त्यांच्या अनुज्ञप्तया 31 मार्च 2015 रोजी चंद्पूर जिल्ह्यात जिथे कार्यरत होत्या त्याच जागेवर जैसे थे, जसे आहे या तत्वप्रमाणे वर्ष 2021-22 चे नूतनीकरण आवश्यक बाबीची पूर्तता करून व महामार्गावरील दारू दुकाने संदर्भात न्यायालयाच्या निर्णयाचे भान राखत व राज्य शासनाचे निर्देश वेळोवेळी लक्षात घेत तात्काळ कारवाई करावी.
दारू परवाना धारकाचा मृत्यू झाला असल्यास त्यांच्या वारसांच्या लेखी संमतीने प्रतिज्ञापत्र सादर करीत तो परवाना सुरू करण्यात यावा.
परवाना नूतनीकरनासाठी एक खिडकी योजनेचा अवलंब राज्य उत्पातन शुल्क विभाग चंद्रपूरच्या करावा.
अन्य जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात दारू परवाना स्थलांतरित करायचे असल्यास त्याची पूर्तता नियमानुसार करण्यात यावी अशी अधिसूचना गृह विभागातर्फे काढण्यात आलेली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण दारू दुकाने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
