चंद्रपूर :- चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी द्या अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा. ना. श्री. राजेश भैय्या टोपे यांचेकडे मुंबई येथे भेट घेऊन केली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.महेबूब भाई शेख हे देखील उपस्थित होते.
लोकसंख्येच्या आधारावर तसेच तालुक्यात एक अश्या निकषांवर ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी देण्यात येते. दुर्गापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असुन या केंद्रावर जवळपास ५०,००० लोकसंख्येचा भार आहे, परंतु सोई सुविधा मात्र उपलब्ध नाही. या केंद्रा अंतर्गत दुर्गापूर, उर्जानगर, कोंडी, वेंडली, नेरी, आंबोरा, पदमापुर, वरवटं, चोरगाव, अडेगाव, आगरझरी, सिनाळा, मसाळा जुना, मसाळा तुकुम, नवेगाव, भटाडी, पायली, चिंचोली, वडोली, कडोली, किटाडी व खैरगाव ह्या गावांचा समावेश असुन २ उपकेंद्र आहे. मात्र लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिजे तेवढ्या सुविधा उपलब्ध नाही. ह्या केंद्राचा भार सद्यस्थितीत एकाच डॉक्टर वर असुन स्टाफ नर्स सुद्धा एकच आहे यामुळे सभोवताल च्या गावातील सर्वसामान्य नागरिकांना योग्य व वेळेवर उपचार मिळत नाही हे लक्ष्यात घेऊन शासन निर्णयानुसार लोकसंख्येच्या आधारावर सदर केंद्राला ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी द्या असे पत्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश भैय्या टोपे साहेब यांना नितीन भटारकर यांनी दिले. त्यावर मा. ना. टोपे यांनी जिल्हास्तरावरून प्रस्ताव मागविण्याचा लेखी सुचना संबंधितांना केल्या.
सदर कायदेशीर प्रक्रियेला थोडा विलंब लागेल म्हणून तो पर्यंत सदर केंद्रातील सुविधा वाढविण्यात याव्या ही विनंती देखील केली असता चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे नावे लेखी निर्देश देऊन तात्काळ सदर केंद्रात पुन्हा १ डॉक्टर वाढविण्यात यावा तसेच सद्यस्थितीत फक्त ८ बेड असुन यातही जागेच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त बेड वाढवावे, कोविड काळात या केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱयांकरिता एन-९५ मास्क व सॅनिटायझर चा तुटवडा होता तो सुद्धा तात्काळ भरून काढावा ह्या देखील सुचना मा. मंत्री महोदयांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना केल्या. सभोवताली असलेल्या गावातील नागरिकांचे कोविड संदर्भातील लसीकरण याच केंद्रात जास्त प्रमाणात होत असल्याने येथे स्टाफ नर्स सुद्धा वाढविण्यात यावे ही विनंती सुद्धा जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी यांना आज नितीन भटारकर यांनी प्रत्यक्ष भेटून केली तसेच आरोग्यमंत्री मा.राजेश टोपे साहेबांचे पत्र देखील डॉ. राजकुमार गहलोत यांना दिले.
सदर चर्चेत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्या अधिकारात येत असलेल्या नियुक्त्या तात्काळ करून बेड वाढविण्याचे आश्वासन दिले असुन सदर केंद्राला ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी मिळेपर्यंत येथील सुविधा वाढवून देणार याची हमी सुध्दा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत यांनी दिली. तसेच स्वतः लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे देखील सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ पिंपळशेंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रदीपजी रत्नपारखी, रा.वि.काँ. जिल्हाध्यक्ष सुजित उपरे व कुणाल ढेंगारे उपस्थित होते.
